
अघोरी व आदिवासी नृत्य ठरले संगमनेरकरांचे आकर्षण

संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर शहरात महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात, डीजेच्या दणदणाटात “छत्रपती शिवाजी महाराज की… जय जय भवानी…. जय शिवाजी!” अशा जयघोषात भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. तब्बल सात तास चाललेल्या या मिरवणुकीत सादर करण्यात आलेल्या अघोरी व आदिवासी नृत्याने संगमनेरकर भारावून गेले.संगमनेर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापासून या मिरवणुकीला आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली, सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी ढोलीबाजा, सनई-चौघडे, त्याच्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, बाल वारकऱ्यांचे भजन, निरगुडे-जाधव वाडी येथील ढोल-ताशा पथक, शिवकालीन मर्दानी खेळ (लाठी-काठी), हरियाणावरून बोलविलेले अघोरी नृत्य, आदिवासी महिला व पुरुषांचे आदिवासी नृत्य, कल्याण-बदलापूरचे आकर्षण बँजो पथक आणि वक्रकुंड डीजे यांसारखी आकर्षणे होती. तरुण मित्रमंडळ भगवे ध्वज हाती घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

ही मिरवणूक लालबहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मेन रोड, चावडी चौक, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या मार्गे संगमनेर बस स्थानकावर समारोप झाली.मिरवणूक बाजारपेठेत आल्यानंतर आ. अमोल खताळ स्वतः सहभागी झाले. बाजारपेठेतील आणि मेन रोडवरील सर्व व्यापाऱ्यांनी आ. अमोल खताळ यांचे स्वागत करत सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे तसेच बस स्थानकावर आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविद्या पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली.

या मिरवणुकीमध्ये शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आगळ्यावेगळ्या मिरवणुकीचे संगमनेरकरांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या देखरेखीखाली मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले.





















