महायुतीच्या सर्व उमेदवारांना बरोबर घेऊन व्हिजन जाहीर करणार

संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक महायुती म्हणून विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत. महायुतीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यात थोडा विलंब होत असला तरी, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे आमचे उमेदवार तयार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर केले जातील. या सर्व उमेदवारांना बरोबर घेऊन संगमनेरचे पुढील व्हिजन मांडणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी
पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती जनसंपर्क कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, ज्यांनी गेल्या ४० वर्षांपासून संगमनेरची सत्ता भोगली ते आज संगमनेरकरांना काय व्हिजन देणार असा सवाल उपस्थित करत आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर अवघ्या एका वर्षामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून, अनेक वर्षांपासून काहींनी जाणूनबुजून राजकारणासाठी प्रलंबित ठेवलेले प्रश्न पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यानंतर आता “संगमनेरकर दहशतमुक्त, भीतीमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त झाले आहेत. त्यांनी आता विकासाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असून जसे एक वर्षांपूर्वी संगमनेरकरांनी महायुतीला साथ देऊन तालुक्यात परिवर्तन घडवले, त्याचप्रमाणे येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीतही विकासाच्या मुद्द्यावर परिवर्तन घडेल. तसेच नगरपरिषदेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विकासकामांचा बॅकलॉग नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भरून काढला जाईल असाही विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.





















