खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा योगा स्पर्धेत दबदबा

0
62

धृव स्कूलच्या खेळाडूंची खेलो इंडिया स्पर्धेत सरस कामगिरी

ध्रृृवच्या योगासनपटूंचे यश
खेळांमध्ये रुची असलेल्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या प्रतिभांचा शोध घेवून त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. शाळेत जागतिक दर्जाच्या योगासन प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुलांच्या आहार आणि नियमित सरावावर विशेष लक्ष दिले जाते. या खेळात भविष्य शोधणार्‍या विद्यार्थ्यांचे शालेय अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही शाळा व्यवस्थापन पूर्ण काळजी घेते. त्याचाच परिपाक म्हणजे तालुक्यापासून उपखंडीय स्पर्धांमध्ये चमकणारे खेळाडू शालेय परीक्षांमध्येही अव्वल गुणांनी उत्तीर्ण होतात.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- बिहारमधील बोधगया येथे पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या योगासन संघाने उत्कृष्ट कामगिरी करताना दहा पदकांची कमाई केली. योगासनांच्या विविध प्रकारात सांघिक आणि वैयक्तिक कामगिरी करताना राज्याच्या योगासनपटूंनी तीन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. खेलो इंडिया स्पर्धेतील योगासनांमध्ये राज्याचे नेतृत्व करणार्‍या मुलींच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर, मुलांच्या संघाने उपविजेतापदासह विजयाची पताका फडकावली.

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने पाठवलेल्या संघातील मुलांच्या गटात अंश मयेकर आणि रोहने तायडे यांनी तालात्मक दुहेरी प्रकारात सुवर्ण पदकाची तर, आर्यन खरात आणि प्रणव साहु यांच्या जोडीने रौप्य पदकाची कमाई केली. याच प्रकारातील मुलींच्या गटातही रुद्राक्षी भावे आणि प्रांजल व्हन्ना या जोडीने सुवर्ण पदक व तृप्ती डोंगरे आणि देवांशी वाकळे यांच्या जोडीने रौप्य पदक मिळवले. कलात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारात प्रांजल व्हन्ना आणि रुद्राक्षी भावे या मुलींच्या जोडीने बाजी मारताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर मुलांच्या गटात अंश मयेकरसह रोहन तायडेच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. योगासनांच्या याच प्रकारातील वैयक्तिक गटात प्रांजल व्हन्नाला रौप्य पदकासह दुसरे आणि रुद्राक्षी भावे, प्रणव साहु व आर्यन खरात यांना कांस्य पदकांसह तिसरे स्थान मिळाले.

राष्ट्रीय पातळीवरील 27 खेळांचा समावेश असलेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना महाराष्ट्राच्या योगासन खेळाडूंनी तीन सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्य पदकांसह मुलींच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद तर मुलांच्या गटात दुसरे स्थान पटकावले. स्वप्निल जाधव, किरण वाडेकर व कुलदीप कागडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत राज्याच्या योगासनपटूंनी मिळवलेल्या यशाबद्दल महाराष्ट्र ऑलिंपिक संघाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव राजेश पवार व तांत्रिक संचालक सतीश मोहगांवकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here