संगमनेर सेशन कोर्टाचा जामीन रद्द करण्याचा निर्णय

घारगाव (प्रतिनिधी) – आंबी खालसा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा, धर्मांतर घडवून आणल्याचा व अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य सहआरोपी युसुफ चौघुले याचा जामीन अखेर रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणातील युसुफ चौघुले यास यापूर्वी सुप्रीम कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, यानंतर तो मध्यप्रदेशमध्ये ६ गावठी कट्टे व ४ जिवंत काडतुसेसह अटक करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा गंभीर स्वरूपाचे आरोप वाढले होते.

या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील सेशन कोर्टात झालेल्या सुनावणीत माननीय न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्या न्यायालयाने युसुफ चौघुले याचा जामीन रद्द करण्याचा निर्णय दिला. या प्रकरणात खाजगी वकील के. डी. धुमाळ यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडली. या निर्णयामुळे संबंधित घटनेबाबत न्याय मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचा सूर जनतेतून उमटत आहे.