भावकीने छळले, सरकारने झुलवले, अखेर मृत्यूला कवटाळले

0
8

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – गावकीची भावकी काय काय करु शकते आणि त्यातून किती कुटुंबांचा संसार उघड्यावर पडू शकतो याचे असंख्य उदाहरणे आहेत. बांध कोरणे, रस्ता आडवणे, उभी पिके नासवणे यावरून झालेल्या संघर्षात अनेक जणांचा बळी गेला आहे. अनेक जण तुरुंगात खितपत पडून आहेत. तर अनेकांचा संसार उघड्यावर पडून पुढच्या पिढ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र यातून कुणीही धडा घेताना दिसत नाही. तालुक्यातील मौजे लोहारे येथे भावकीतीलच काही जणांनी दांडगाई करून रस्ता अडवला. रस्ता नसल्याने शेती करता येईना, जनावरे सांभाळता येईना, मुलांना शिक्षण देता येईना म्हणून एका शेतकर्‍याने प्रचंड संघर्ष केला. शासन दरबारी अनेक हेलपाटे मारले सरकार कागदी घोड्यांमध्ये अडकून पडले. अखेर या तरुणाने मागे पत्नी, तीन मुले, आई वडील यांना सोडून मृत्यूला कवटाळले. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. भावकीने छळले, सरकारने झुलवले म्हणून एका तरुण शेतकर्‍याला आपला जीव द्यावा लागतो ही मोठी शोकांतिका आहे. आज या तरुणाचा दशक्रिया विधी झाला मात्र अजूनही रस्ता झाला नाही. त्यामुळे मयत तरुणाच्या कुटुंबाने तहसीलदारांना निवेदन देत रस्ता देणार नसेल तर आम्ही पण आपला जीव देतो. त्यामुळे आता प्रशासन खडबडून जागे झाले असून पुढील दोन दिवसांत रस्ता मोकळा करून देतो असे आश्‍वासन तहसीलदार यांनी दिले आहे.

संगमनेर तालुक्यातील मौजे लोहारे येथे मोठे बाबा ते कदमवाडी जाणारा एकमेव पानद रस्ता गेली अनेक वर्षे बंद असल्याने पोकळे वस्तीत राहणार्‍या कुटुंबांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या एकाच रस्त्यावरून वस्तीवरील शेतकर्‍यांचा वहिवाट असताना दोन शेतकर्‍यांच्या आक्षेपामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
यासंदर्भातील कामकाज रस्ता केस क्रमांक 62/223 मध्ये मंडलाधिकारी ते तहसीलदार पातळीवर सुनावणी होऊन 13 मार्च 2024 रोजी तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. मात्र संबंधित व्यक्तींनी केवळ वेळकाढूपणा करत आदेशाची अमलबजावणी होऊ न देता फाईल उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रलंबित ठेवून दिल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या योगेश पोकळे यांचे वडील आणि अर्जदार दिलीप पोकळे यांनी केला आहे.

दरम्यान, रस्ता बंद असल्याने योगेश दिलीप पोकळे या तरुण शेतकर्‍याला स्वतःच्या तिन्ही मुलांना खांद्यावर बसवून शाळेत ने-आण करावी लागत होती. दुधाच्या किटल्या खांद्यावर वाहतूक करावी लागत होती. या मानसिक-शारीरिक त्रासाला कंटाळून 18 ऑक्टोबर 2025 रोजी योगेश पोकळे यांनी आपल्या घराजवळ असणार्‍या पोल्ट्री फार्ममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेने कुटूंब प्रचंड धास्तावले. पोलीसात तक्रार देण्याचे बळ देखील उरले नाही. केवळ रस्त्यासाठी मुलाला जीव गमवावा लागल्याने पालकांनी आता तहसीलदारांकडे धाव घेत आखेरची विनवनी केली आहे.

शासकीय नोंदवहीतसुद्धा हा पानद रस्ता म्हणून अस्तित्वात असून रस्ता बाधित 19 पैकी 17 शेतकर्यांनी रस्ता करण्यास हरकत नसल्याचे लेखी नमूद केले आहे. केवळ सुभाष भाऊसाहेब पोकळे व दिगंबर बाळासाहेब पोकळे हे दोघेच आडकाठी करत असल्याचे अर्जदारांनी निवेदनात नमूद केले आहे. अर्जदारांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात चेतावणी दिली आहे की, रस्ता तातडीने सुरु न केल्यास आम्हाला आमरण उपोषण वा आत्मदहन करावे लागेल. त्यातून उद्भवणार्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने योग्य दखल घेऊन तातडीने आदेशांची अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here