संपादक किसन भाऊ हासे यांची बदनामी केल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत संगमनेरमध्ये पहिला गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)-
संगमनेर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघातात निधनानंतर सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या विकृत माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे याने स्व. अजितदादांवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली. हा विकृत एव्हढ्यावरच थांबला नाही तर त्याने या घटनेची बातमी दैनिक युवावार्ताने प्रकाशित केल्याचा राग धरून त्याच्या फेसबुक पेजवर संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील पोस्ट केली. त्याच्या या विकृती विरूद्ध दोन दिवसांपासून सर्व पक्षीय कार्यकर्ते संताप व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात झाला. तसेच वर्तमानपत्र व संपादकांची बदनामी करून धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत व बीएनएस नुसार विकृत दिनेश फटांगरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारांना धमकी व बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहरात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था अधिनियम 2017 कलम 4 (पत्रकार संरक्षण कायदा), तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 351, 352, 353(1), 356(1) अन्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आपली विकृती कायम ठेवत माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ पोस्ट शेअर केली. त्याविषयी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीसरा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांत तीन गुन्हे दाखल होत असलेला हा विकृत मात्र अजूनही फरार असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

स्व. अजितदादांविषयी घडलेल्या घटनेची बातमी दैनिक युवावार्ताने प्रकाशित केली. त्या बातमीवर फटांगरे याने कमेंट करत अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. त्याचबरोबर त्याच्या फेसबुक पेजवर संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची अश्लील टीका करणारी पोस्ट केली. सर्व वर्तमान पत्रांप्रमाणेच दैनिक युवावार्तानेही या बातमीला कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रसिध्दी दिली. मात्र त्याने दैनिक युवावार्ता टार्गेट करत फेसबुक पेजवर संपादकांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका करून समाजात वर्तमानपत्राची व संपादकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. याअगोदरही त्याने धमकीवजा अनेक अपमानास्पद पोस्ट केलेल्या आहेत. या सर्व कृत्य त्याने केवळ बातमीतून दुखावल्याने केले आहे.

मागील एक वर्षापासून त्याचा हा विकृत प्रकार सुरू होता. ज्याची दखलही घ्यायची नाही, अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करत युवावार्ता परिवाराने अत्यंत संयमाने आपले कार्य सुरू ठेवले होते. मात्र दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी या इसमाने अश्लीलतेचा कळस गाठला. त्यामुळे दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी सर्व सामाजित संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार व विविध पत्रकार संघटनांच्या पदाधिकार्यांसह पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे व शहर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासमवेत चर्चा करून लेखी निवेदन दिले व आवश्यक पुरावे सादर केले. व्यक्तिगत पातळीवर करण्यात आलेली अश्लील, बदनामीकारक, धादांत खोटी टीका आम्ही कदापी सहन करणार नाही.

दरम्यान दिनेश फटांगरे हा अतिशय विकृत इसम असून नशेच्या धुंदीत तो सोशल मीडियावर अनेक प्रतिष्ठित नागरिकांवर अतिशय खालच्या भाषेत पोस्ट टाकत असतो. या विकृत इसमावर शहर पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी व गुन्हे दाखल आहेत. आताही दोन दिवसात तीन गुन्हे दाखल होत आहे. आमदार अमोल खताळ यांनी दिनेश फटांगरे याला वेळोवेळी समज देऊनही आमदार अमोल खताळ यांना डावलून त्याने बदनामीचे उद्योग चालूच ठेवले आहे. त्यामुळे शिवसेनेने केवळ त्याची पदावरून हाकालपट्टी केली आहे. मात्र तो अजूनही पक्षात कार्यरत आहे. यासाठी आमदार खताळ यांनी संगमनेर नागरिकांची बदनामी लक्षात घेवून त्याची पक्षातूनही हाकालपट्टी करावी.

प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असतात. सरकार-समाजामध्ये चाललेल्या वेगवेगळ्या घटनांचा आढावा घेणे, अन्यायाविरूध्द ठोस भूमिका मांडणे ही वर्तमानपत्राची भूमिका असते. युवावार्ताने वेळोवेळी हीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरेदेखील गेलो आहे. परंतू यावेळी मात्र या विकृत इसमाने अतिशय खालची पातळी गाठत केवळ एका वर्तमानपत्राचीच नाही तर संपूर्ण प्रसारमाध्यमांची बदनामी केली आहे. या इसमावर कडक कारवाई झाल्यास समाजाला तो वेगळा संदेश असेल. त्यामुळेच आज सर्व पत्रकार, विविध संघटना यांनी या घटनेचा निषेध करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या विकृतीसमोर सलग 3 गुन्हे दाखल होऊनही तो पोलिसांच्या हाती लागत नाही हे दुर्देव आहे. पोलिसांनी तात्काळ या विकृत इसमाला गजाआड करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
किसन भाऊ हासे
(संस्थापक, दैनिक युवावार्ता )



















