पत्नीचा खून करून नवऱ्याने रचला बनाव

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – एक चाळीस वर्षीय विवाहित महिलेचा तालुक्यातील जाखुरी येथे खून झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेने जाखुरी आणि परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत तीच्या पतीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. आणि अवघ्या 24 तासात पोलिसांनी या खूनाचा छडा लावत आरोपीला गजाआड केले. यातील आरोपी हा दुसरा तिसरा कुणी नसून फिर्यादी पतीच निघाला आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी तालुका पोलिस ठाण्याचा चार्ज घेतलेल्या पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, आरोपी पती भारत रामभाऊ मोरे (मूळ रा. नागमठाण, ता. वैजापूर जिल्हा संभाजीनगर, हल्ली रा. मांडे मळा, जाखुरी, ता. संगमनेर) याचे पहिले लग्न संगिता हिच्या बरोबर झाले होते. मात्र त्यांच्यात पटत नसल्याने त्याने अलकाबाई हिच्याशी दुसरे लग्न केले होते. मात्र त्याने त्यासाठी पहिली पत्नी संगिता हिला सोडचिठ्ठी दिली नाही. त्यामुळे ती दोन्ही बायका सांभाळण्याची वेळ त्याच्यावर आली होती. पहिली पत्नी संगीता ही देखील त्याला सोडत नव्हती.

दरम्यान आरोपी भारत मोरे याचे व्याही सोमनाथ बाबुराव सुरसे यांचेकडे सध्या कामानिमित्त ते जाखुरी येथे रहात होते. त्यांची मुलगी शितल ही तिच्या पतीसह जाखुरी गावात राहते. त्यामुळे पहिली पत्नी संगिता ही देखील नागमठाण येथून आठ दिवसापूर्वी पती भारत याच्याकडे राहावयास आली होती. 10 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आरोपी याने पत्नी संगिता, दुसरी पत्नी अलकाबाई, व्याही सोमनाथ सुरसे व त्यांची पत्नी मुक्ताबाई मुलगा नवनाथ सुरसे व नागमठाण येथील ओळखीचा भागीनाथ चांगदेव माळी (रा. नागमठाण, ता. वैजापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सर्वजण रात्री जेवण करुन झोपले होते. आणि हिच संधी साधून आरोपी पती भारत मोरे याने दोन दोन बायकांना कंटाळून पहिली पत्नी संगीता हिचा गळा दाबून खून केला. आणि अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा बनाव रचला. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता घराच्या पाठीमागे असलेल्या फॉरेस्टमध्ये पत्नी संगिता भारत मोरे हिचा मृतदेह फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंखे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी संगीता मोरे यांच्या गळ्याजवळ काही खुणा पोलिसांना आढळून आल्या होत्या. सुरवातीला या प्रकरणातील संशयाची सुई तीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्राकडे जात होती. परंतु मोठा अनुभव पाठीशी असणार्या पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी या प्रकरणी कसून तपासणी केली असता त्यांना फिर्यादी पतीवर संशय आल्याने त्यांनी त्यास पोलिस खाक्या दाखवताच फिर्यादी पती पोपटासारखा बोलू लागला आणि आपणच आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली.






















