पैसे वाटताना तावडीत सापडलेल्या “तावडेवर’’ कारवाई करा- आमदार थोरात
महाराष्ट्र BJP च्या नेत्यांनीच बहुजन चेहरा संपवण्यासाठी विनोद तावडेंचा गेम केला -संजय राऊत
संगमनेर (दैनिक युवावार्ता) राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरु आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा आणि सत्ताधारी मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाने भाजप आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. पण राज्यात सत्ताधारी पक्षांकडून दररोज आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. आज वसई विरार परिसरातील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटत असताना नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवरून संपूर्ण देशाने पाहिले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. जवळपास १० लाख रुपयांची रोकड जप्तही केली आहे पण कुणालाही अटक केली नाही. निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरील नेत्यांनी व स्टारप्रचारकांनी मतदारसंघात थांबण्यास कायद्याने मनाई असतानाही तावडे वसई विरार मध्ये काय करत होते? निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी व पोलिसांनी त्यांना का रोखले नाही? पैसे वाटताना रंगेहाथ पकडूनही त्यांना अटक का केली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कालच नाशिक शहरात एका हॉटेलमध्ये मोठी रक्कम सापडली होती. त्यापूर्वीही पुणे परिसरात सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका गाडीतून पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. राज्याच्या विविध भागात दररोज मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये मिळत आहेत पण दुर्देवाने काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी भाजप आणि विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे
संजय राऊत यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. निवडणूक आयोग निष्पक्षपाती असता तर ही कारवाई बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांऐवजी आयोगाने केली असती, असे ते म्हणाले. विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. आता या निवडणुकीतील भाजपचा खेळ खल्लास झाला आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला. भाजपतील बहुजन नेतृत्व संपवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी तावडेंना अशा प्रकारे पकडून देण्याचे कारस्थान रचले. संजय राऊत म्हणाले, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडले, ते कॅमेऱ्यापुढे आहे. या प्रकरणी खुलासे कशाचे होत आहेत? विनोद तावडे हे भाजपचे सरचिटणीस आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस यांच्याकडे तब्बल 5 कोटी रुपये सापडलेत. बहजुन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे जप्त केलेत. पैसे तोंडावर फेकले तोंडावर व गोंधळ घालून विनोद तावडे यांना तिथे कोंडून ठेवले. यावर कोणता खुलासा करणार हे भाजपने सांगावे.
विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील. त्यांच्या हातात या राज्याची काही सूत्रे आहेत. ते मोदी व शहांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने पकडून देण्याचे कारस्थान भाजपमध्ये रचले गेले. ज्यांच्याकडे गृह खाते आहे त्यांच्याकडे यासंबंधीची जास्त माहिती असते, असेही संजय राऊत यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.