
मूळचे पारनेर येथील रहिवासी असलेले सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस
सुधाकर पठारे हे अहमदनगर जिल्ह्यातील वाळवणे (ता. पारनेर) येथील रहिवासी होते. 1998 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी पोलीस सेवेत प्रवेश केला आणि 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी झाले. त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करत कायदा-सुव्यवस्था राखण्यात मोठी भूमिका बजावली. एम.एस्सी. अॅग्री आणि एलएलबी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी विविध सरकारी खात्यांमध्ये सेवा केली होती. श्रीशैलम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना तेलंगणात अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
दैनिक युवावार्ता – कर्नूल (तेलंगणा) – महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी (आयपीएस) डी सी पी सुधाकर पठारे आणि त्यांचे भाऊ भागवत खोडके तेलंगणात झालेल्या अपघातात ठार झाले आहेत. सुधाकर पठारे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अनेक पदांवर काम केलं आहे आणि सध्या ते डी सी पी म्हणून कार्यरत होते. तेलंगणातील श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जात असताना नगरकुरनूलजवळ श्रीशैलम घाटात झालेल्या अपघातात सुधाकर पठारे आणि त्यांच्या भावाचाचा मृत्यू झाला आहे.
दोघेही इनोव्हा कारने श्रीशैलमला जात असताना, दुपारी १२ वाजताच्या सुमारास, घाट परिसरात त्यांच्या कारला बसने धडक दिली. दोघांपैकी कोणीही सीट बेल्ट घातलेला नव्हता. सुधाकर पठारे यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर भागवत खोडके यांच्या पायाला आणि पोटाला अंतर्गत दुखापत झाली. अपघात स्थळावरुन त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी तिथे पोहोचल्यानंतर दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं. यामध्ये दोघांचंही शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती नगरकुरनूलचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड यांनी दिली.पोलीस अधिकारी असलेले सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी होते. सुधाकर पठारे यांनी सुरुवातीला एम.एस्सी. अॅग्री ची पदवी घेतली. त्यानंतर ते एलएलबी झाले. ते पोलीस अधिकारी म्हणून सरकारी सेवेत रमले, मात्र ते आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे.सुधाकर पठारे हे स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. त्यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर ते पोलीस खात्यात रमले. त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.
सुधाकर पठारे नॅशनल पोलीस अकादमी हैदराबादमध्ये प्रशिक्षणासाठी आले होते. आज ते दर्शनासाठी श्रीशैल्यमला निघाले होते. त्यांच्या गाडीची आणि बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघाताची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. तसंच हैदराबादमध्ये पोलीस अकादमीमध्येही या अपघाताची माहिती देण्यात आली. दोन्ही मृतदेह महाराष्ट्रात पाठवण्यात आले. – वैभव गायकवाड, पोलीस अधीक्षक, नगर कर्नुल
सुधाकर पठारे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तसंच पोलीस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर या ठिकामी कामगिरी केली आहे. एस पी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलीस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.