सेवानिवृत्त व्यक्तीची 65 हजारांची सोनसाखळी लंपास

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – नाशिक-पुणे महामार्गावरील चौधरी ढाब्याजवळ बनावट सीआयडी अधिकार्यांनी चलाखीने एका सेवानिवृत्त व्यक्तीला गंडवून 65 हजार रुपये किमतीची साडेतीन तोळ्यांची सोनसाखळी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्ताच आम्ही सात लाखांची चोरी पकडली असून, तुमच्यावर आमचा संशय आहे, असा बनाव करत आरोपींनी थेट पोलिसी धाक दाखवत लुटमार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना 14 जून 2025 रोजी सकाळी 11 ते 11.45 वाजण्याच्या दरम्यान घडली. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा (गु. र. नं. 0391/2025) नोंदवण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, केशव नाथा गोसावी (वय 69, रा. सावित्रीबाई फुले चौक, बटवाल मळा, संगमनेर) हे त्यांच्या प्लॅटिना दुचाकीने (चक 17 ऊऋ 8035) धार्मिक विधीसाठी चंदनापुरी घाटातून संगमनेरकडे येत असताना, चौधरी ढाब्याजवळ तिघांनी त्यांना अडवले. यातील एकाने स्वतःला ‘सीआयडी अधिकारी’ म्हणून सादर करत धमकी दिली – सात लाखांची चोरी पकडली आहे, आणि तुमच्यावर संशय आहे.
त्या बनावट अधिकार्यांनी त्यांच्याकडील डिक्की उघडण्यास सांगितले व त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेण्यास भाग पाडले. सोने घालून प्रवास करण्यास मनाई आहे, असे सांगत त्यांनी गोसावी यांच्याकडील रुमालात तंबाखूची पुडी, पाकीट आणि सोनसाखळी बांधली. रुमाल डिक्कीमध्ये ठेवण्यास सांगून, त्यांच्या लक्षात न येता त्यातील साखळी चोरून नेली. त्यानंतर येथे थांबू नका असे सांगत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गोसावी घरी परतल्यावर डिक्कीतील रुमाल उघडल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सोनसाखळी गायब होती. संबंधित सोनसाखळीवर ओम चे पेंडंट असून ती साडेतीन तोळे वजनाची, अंदाजे 65 हजार रुपये किमतीची असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.