प्रवरा, म्हाळुंगी नदीकाठ, नाटकी नाला, लेंडी नाला – छोटो मोठे ओढे यावरील अतिक्रमणाचे काय ?

नैसर्गिक धोका कायम
संगमनेर शहरात प्रामुख्याने म्हाळुंगी नदी, लेंडी नाला, नाटकी नाला आणि बहुतांशी छोट्या मोठ्या नाल्यांवर अतिक्रमण झाले असून, काही ठिकाणी या नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद करण्यात आले आहे. त्यावर मोठी बांधकाम करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी पाइप टाकून प्रवाह बंदिस्त केले आहेत. नाल्याच्या बाजूला पक्की बांधकामे झाल्याने अनेक ठिकाणी प्रवाह अरुंद झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात ओढ्या-नाल्यांमधून नैसर्गिकरीत्या पाणी वाहून जात नसल्याने हे पाणी रस्त्यांवर तसेच नागरिकांच्या घरांत शिरते. याचा मोठा पुरावा म्हणजे म्हाळुंगी नदीला येणाऱ्या प्रत्येक पुरात शेजारील गोरगरिब नागरिकांच्या झोपड्यांचे नुकसान होते तर देवाचा मळा देखील प्रभावित होतो. म्हाळुंगी नदीवरील साई नगरचा भाग देखील अनेकवेळा पाण्यात जातो. मालदाड रोड कडून येणारा नाटकी नाला आज अरूंद गटार झाल्याने शहरात एखादा मोठा पाऊस जरी झाला तरी मालदाड रोड, बसस्थानक परिसर आणि नवीन नगर रोड पाण्याखाली जातो. अनेक वेळा मोठ्या पावसात येथील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. स्वतः नगरपालिकेने देखील नवीन रोडवर या नैसर्गिक ओढ्यावर शॉपिंग कॉम्लेक्स बांधले. मात्र आज हे कॉम्ल्पेक्स धोकादायक इमारत म्हणून जाहीर झाले आहे. सुकेवाडी रोड पुढे भारतनगर याभागाला देखील पाण्याचा मोठा फटका बसतो. हे केवळ नैसर्गिक प्रवाह अडविल्याने नुकसान होत आहे. यावर प्रशासनाने भूमिका घेणे गरजेचे आहे.

दैनिक युवावार्ता (संजय आहिरे)-
महाराष्ट्रात पावसाचे अस्मानी संकट आल्याने शेती आणि शेतकर्याचे नुकसान तर झालेच शिवाय अनेक शहरात आणि खेड्यांमध्ये सुद्धा पुराचे पाणी घुसल्याने शेतकरी, नागरीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र या आपत्तीला निसर्ग जेवढा जबाबदार आहे तेव्हढेच मानव निर्मित केलेले अडथळे देखील जबाबदार आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली नद्या, ओढे, नाले यांचे नैसर्गिक प्रवाह अडवले जातात आणि संकट ओढावून घेतले जाण्याचे प्रकार शहरी भागात सातत्याने वाढू लागले आहे. संगमनेर शहरात देखील प्रवरा, म्हाळुंगी नदी, नाटकी नाला, लेंडी नाला त्याचबरोबर इतर अनेक छोटे, मोठे ओढे, नाले बुजून त्यावर मोठमोठे अतिक्रमण करण्यात आले आणि आजही ते सुरू आहे. राजकीय आशीर्वाद आणि प्रशासनाचा छुपा पाठिंबा यामुळे या धोकादायक ठिकाणचा विकास आज चांगला वाटत असला तरी तो उद्याच्या संकटाला निमंत्रण देणारा नक्कीच ठरणार आहे. ग्रामीण भागात पूर परिस्थितीला तोंड देताना परिसर मोकळा असू शकतो मात्र दाट लोकवस्ती असलेल्या शहरामध्ये आणीबाणीच्या प्रसंगी सहकार्य करणे कठीण होते.
नागरी वस्तीचे नियोजन, रहिवास आणि नियंत्रण नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे असते. शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून विकास कामे होत असताना नियमात असतील तर नागरिकांची सोय होते मात्र व्यक्तिगत स्वार्थ हेतूंनी चुकीची विकास कामे झाली तर जनतेला प्रचंड त्रास होतो. अनेक प्रसंगी सामान्य नागरिकांना अन्याय सहन करावा लागतो.

मागील वीस वर्षांपासून संगमनेर शहरामधील अतिक्रमणे हा अतिशय गंभीर विषय बनला आहे.
निवडणुकांमधील कोट्यवधीचा खर्च वसूल करण्यासाठी व झटपट श्रीमंत होण्यासाठी काही लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणजे सोन्याची कोंबडी समजतात. त्यासाठी शहरातील मोकळे भूखंड, नाले, सार्वजनिक वापराच्या जागा, गटारी, बेवारस मालमत्ता शोधून हडप करणे हा छुपा अजेंडा राबविला जातो. त्यासाठी नगरपालिका कर्मचारी, अधिकारी यांना हाताशी धरुन अतिक्रमणे आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने सार्वजनिक मालमत्तेचे किंवा नैसर्गिक स्रोतांचे प्रचंड नुकसान होते. काही नागरिकांनी विरोध केला तर दबाव टाकला जातो, अडवणूक केली जाते, प्रसंगी दमदाटीही केली जाते. लोकसेवक म्हणून सार्वजनिक ठिकाणी मिरवणार्या सफेद कपड्यातील दरोडेखोरांनी केलेल्या पापांचा उद्रेक नैसर्गिक संकटामध्ये सर्वांना भोगावा लागतो. वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सरकारी मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी नैसर्गिक स्रोतांमध्येच सुरवातीला कच्ची आणि नंतर पक्की बांधकामे करून अडथळा निर्माण करतात. ही पक्की बांधकामे होत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून असतात. मात्र कधी नैसर्गिक संकट आले तर हेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मदत कार्यात आम्ही कसे आघाडीवर असतो असा ढोल पिटत असतात.

संगमनेर शहरातील जुनी बाजारपेठ याच अतिक्रमणामुळे डबघाईस गेली आहे. विशेषतः व्यापारी बाजारपेठांमध्ये झालेली अतिक्रमणे यामुळे बाजारपेठ अरुंद होते आणि बाजारपेठेची गल्लीत रूपांतर होते. अशी अतिक्रमणे ही आग लागली असता किंवा पूर आला असता अत्यंत धोकादायक ठरतात. अनेक प्रसंगी अनधिकृत बांधकाम केले जाते किंवा नैसर्गिक ओढे नाले बुजवून नागरी वस्त्या बनवल्या जातात. विशेषतः बांधकाम ठेकेदार किंवा जमिनीचे व्यवहार करणार्या व्यक्ती बरेच प्रसंगी कायद्याची शिस्त न पाळता किंवा खोटी कागदपत्रे बनवून नागरिकांची फसवणूक करतात. अनधिकृत असलेली बांधकामे किंवा नागरी वस्ती जेव्हा निसर्गाचा कोप होतो तेव्हा प्रथम या नागरिकांचा बळी जातो.

संगमनेर शहरात म्हाळुंगी नदीवरील अतिक्रमणे किंवा नाटकी नाल्यावरील अतिक्रमणे किंवा नवीन नगर रोड गटारीवरील बांधकामे ही अतिक्रमणाची उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी मोठी बांधकामे होत असताना त्यासाठी जो शासकीय मंजुरी नकाशा असेल त्या ऐवजी अधिक नफ्यासाठी त्यात बदल करून बेकायदेशीर किंवा अशासकीय बांधकामे केली जातात आणि नागरिकांची त्यामध्येही फसवणूक होते. जेव्हा निसर्गाचा उद्रेक होतो तेव्हा आगीचे प्रसंगी, भूकंप झाला असताना किंवा मोठा पूर आला असताना अशा घटनांमध्ये अतिक्रमित किंवा अशास्त्रीय नागरी वस्त्या बळी पडतात. विशेषतः शहरांच्या सभोवताली असलेल्या रोडवरील टपर्या किंवा पालांमध्ये राहणारे नागरिक हे रस्त्यावरील अतिक्रमण करतात आणि जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा त्यांच्या पुनर्वसनाचा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. तसेच फूटपाथवर विक्री करणारे पथारीवाले, फेरीवाले आणि वाहने उभी करणारे नागरिक रहदारीला अडथळे ठरतात.

जेव्हा निसर्गाचा उद्रेक होतो म्हणजे भूकंप, महापूर अशा प्रसंगी जे पुराचे लोंढे येतात त्यामध्ये अतिक्रमांचे धोंडे आडवे असतात आणि जीवित आणि वित्तीय मालमत्तांचे प्रचंड नुकसान होते. म्हणून युवावार्ताची भूमिका अशी की शहरातील किंवा निसर्गातील होणार्या अतिक्रमणांची किंवा निसर्गाविरुद्धची कृती ही मानवाच्या आयातीचीच असते आणि स्वार्थापोटी बेकायदेशीर काम करणार्या नागरिकांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या कृतींचा भयानक त्रास सामान्य जनतेला होतो. यावर प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन संगमनेरमधील ही अतिक्रमणे काढली पाहिजेत.
