सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये कांस्यपदक

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर शहरातील प्रथितयश डॉक्टर ऋषिकेश वाघोलिकर यांनी अलीकडेच सातार्यात आयोजित करण्यात आलेली प्रतिष्ठित ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ (डककच) यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. सातारा परिसरातील निसर्गरम्य आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठार या भागात ही स्पर्धा पार पडली. या मॅरेथॉनची एकूण लांबी 21.1 किलोमीटर असून, 420 मीटर एवढा एकूण उंचीचा चढ पार करावा लागतो. भारतातील सर्वात कठीण आणि रोमांचक मॅरेथॉन मार्गांपैकी एक मानल्या जाणार्या या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकांना अत्यंत काटेकोर शारीरिक व मानसिक तयारी करावी लागते.
या मॅरेथॉन मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या 10.5 किलोमीटरमध्ये सतत चढ चढावा लागतो, तर पुढील 10.5 किलोमीटरमध्ये सतत उताराचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही स्पर्धा धावपटूंना त्यांच्या सहनशक्तीची, चिकाटीची आणि शिस्तीची खरी परीक्षा घेते. या आव्हानात्मक परिस्थितीतही डॉ. हृषिकेश वाघोलिकर यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर हा आव्हानात्मक प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला.

सातारा रनर्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. या संस्थेचे ध्येय केवळ एक दिवसाच्या स्पर्धेपुरते मर्यादित नसून, संपूर्ण वर्षभर फिटनेस, आरोग्य आणि समुदायभावना वृद्धिंगत करणे हे आहे. संस्थेतर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामुळे अनेकांनी वजन कमी करून आपले आरोग्य सुधारले आहे आणि 5 किमीपासून पूर्ण मॅरेथॉनपर्यंत धावण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे.
डॉ. हृषिकेश वाघोलिकर यांच्या या कामगिरीने संगमनेरमधील तरुणांना आणि फिटनेसप्रेमींना एक प्रेरणादायी आदर्श मिळाला आहे. त्यांच्या चिकाटीने आणि जिद्दीने सिद्ध करून दिले आहे की मनात निश्चय आणि तयारी असेल तर कोणतेही लक्ष्य गाठता येते. त्यांच्या या यशाबद्दल संगमनेरवासीयांकडून आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकार्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन.