पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत अटक, चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

संगमनेर (प्रतिनिधी)
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सर्व जण शोक व्यक्त करत असताना सोशल माध्यमात अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक मजकूर शिवसेनेच्या तत्कालीन शहर प्रमुख दिनेश फटांगरे याने प्रसारित केला. त्यामुळे त्याला पक्षाने शहर प्रमुख पदावरून तात्काळ हटवले. या संतापजनक प्रकाराची बातमी प्रसिद्ध केल्याने फटांगरे याने थेट दैनिक युवावार्ता संपादकांवर सोशल माध्यमातून अश्लील टीका करुन त्यांना धमकी दिली. याप्रकरणी दिनेश फटांगरे विरोधात शहर पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून तो फरार होता. या घटनेनंतर आज (सोमवार ता. ३) सकाळी अकराच्या सुमारास आरोपी फटांगरे स्वतःहून पोलिसांना शरण आला असून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दिनेश फटांगरे याने सोशल माध्यमातून अतिशय संतापजनक असा मजकूर प्रसारित केला. त्यावरुन शहरात संतापाचे वातावरण निर्माण होवून संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सदरचा मजकूर हटवण्यात आला, मात्र जनमानसात प्रचंड रोष निर्माण झाला होता. आमदार अमोल खताळ यांच्या आदेशावरुन त्याची पदावरुन लगेच हकालपट्टीही करण्यात आली.
शहरात घडलेल्या या दोन्ही घटना महत्वाच्या असल्याने सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी त्यांची दखल घेतली. दैनिक युवावार्ताने या घटनेची दखत घेत शिवसेनेच्या पदच्युत शहरप्रमुखाविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. मात्र त्याचा व्यक्तिगत राग मनात धरुन फटांगरे याने त्या बातमीच्या संदर्भाने सोशल माध्यमातून संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जावून अश्लील टीका करण्यासह त्यांची व्यक्तिगत बदनामी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या संगमनेरातील पत्रकारांनी एकत्रितपणे या घटनेचा निषेध नोंदवून आरोपी विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत व सदर प्रकरण अतिशय गंभीर असल्याने पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी आरोपी दिनेश फटांगरे याच्या विरोधात ज्येष्ठ पत्रकार किसन हासे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय न्यायसंहितेसह पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते व त्यानुसार संगमनेरात हा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यामुळे फटांगरेवर अटकेची तलवार लटकत होती.
फरार फटांगरे याने आज (ता.3) सकाळी अकराच्या सुमारास स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कायदेशीर सोपस्कार पूर्ण करीत त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले व त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणी गंभीर दखल घेत त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.





















