ब्रेक फेल, दगडफेक करून व्यापाऱ्याला मारण्याचा प्रयत्न

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील एका मासे व्यापार्याच्या गाडीला अज्ञात इसमांनी परस्पर जीपीएस बसवले. त्याद्वारे पाळत ठेवून इंदापूर येथे त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल करून गाडी अपघातग्रस्त केली. त्यातून ते वाचले. त्यानंतर खांडगाव परिसरात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. हा प्रकार अज्ञातांनी जाणीवपूर्वक करुन एक प्रकारे जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा कट असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी संदिप विलास कचेरे रा. धांदरफळ यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत तक्रारदार संदीप कचेरे यांनी म्हंटले आहे की, त्यांचा महिंद्रा जितो गार्डी क्रं. एमएच 17 बीडी 6226 ही गाडी व्यवसायानिमित्त येथे 17 मार्च रोजी नेली असता तिचा ब्रेक फेल होऊन मोठा अपघात झाला.

तांत्रिक अडचणीमुळे हा अपघात झाला असल्ययाचे समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर 21 मे रोजी खांडगाव परिसरात गाडीवर दगडफेक करण्यात आली. कोणी खोडसाळपणा केला असेल म्हणून पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले. मात्र गाडीची साफसफाई करीत असतांना गाडीच्या खालच्या बाजूस जीपीएस ट्रॅकर लावलेला आढळून आले. या प्रकाराने कचेरे यांना धक्का बसला. कचेरे यांची गाडी व्यापारानिमित्त नेहमी बाहेर असते. त्यामुळे या जीपीएसद्वारे लक्ष ठेऊन अज्ञात इसमांकडून घातपात करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. अपघातामुळे गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कचेरे यांनी पोलीसात धाव घेतली. तक्रार अर्ज देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान वाहनाला परस्पर जीपीएस बसवणे, पाळत ठेवणे, घातपाताचा प्रयत्न करणे या प्रकाराने धांदरफळ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.