नव्या पिढीसाठी सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृतींची परंपरा

सन १९८५ पासून साळीवाडा तरुण मित्र मंडळ हे लोकमान्य टिळकांच्या अभिप्रेत समाजजागृतीपर गणेशोत्सवाचे ध्येय अखंड जोपासत आहे. या मंडळाचा मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध मूर्तिकार देवीदास गोरे सर यांची सृजनशील कलाकृती. वर्षभरात घडलेल्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि राष्ट्रीय घटनांना स्पर्श करणाऱ्या या मूर्ती केवळ कलात्मक नसून प्रबोधनपर संदेश देणाऱ्या असतात.

यावर्षीच्या देखाव्यासाठी शेती साहित्य वापरून देवीदास गोरे सर यांनी गणपती साकार केला. या साहित्यासाठी नितीन हासे यांच्या सह्याद्री अॅग्रोव्हेटची मोठी मदत झाली.
विविध साहित्यांपासून घडलेले श्रीगणेश
गोरेंनी आजवर साकारलेल्या गणेशमूर्ती ही नाविन्यपूर्णतेची परंपरा आहे.

प्लास्टिकचा प्रश्न अधोरेखित करण्यासाठी प्लास्टिकपासूनचा गणेश,
ई-कचऱ्याचा पुनर्वापर दाखवण्यासाठी कॉम्प्युटर साहित्याचा गणेश,
भाजीपाल्याचा गणेश, गुळाचा गणेश, भांड्यांचा गणेश, पाईपचा गणेश, लॉन्सपासूनचा गणेश,

नारळाचा गणेश, चेंडूंचा गणेश, फुग्यांचा गणेश, केळीच्या घडांचा गणेश, गिफ्ट पेपरचा गणेश,
फरशी साहित्याचा गणेश, वाद्यांचा गणेश, टोपल्यांचा गणेश, मोटारसायकलच्या पार्ट्सपासूनचा गणेश,

अगदी कोरोनाकाळातसुद्धा इंजेक्शन, मास्क, सॅनिटायझर यापासून बनवलेला कोरोना गणेश
या सर्व मूर्तींमध्ये संदेश स्पष्ट – “समाजातील समस्या, प्रश्न आणि घडामोडी यांचे प्रतिबिंब म्हणजे गणेशमूर्ती.”

समाजजागृतीचा अनोखा ध्यास
कोरोनाकाळात गोरे सरांनी मूर्ती तयार करून ऑनलाईन आरती केली आणि विसर्जनही वर्कशॉपमध्येच केले, जेणेकरून लोकांना धोका पोहोचू नये.
मागील वर्षी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना आवाज देण्यासाठी बाहुल्यांच्या गणेशमूर्ती, तर यावर्षी (२०२५) ओला दुष्काळ व शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्यासाठी दुग्धसाहित्यांचा गणेश साकारला.
अवलिया कलाकाराचा गौरव
एका वर्षी आयपीएस कृष्ण प्रकाश यांनी उद्घाटनावेळी भावनिक शब्दांत गौरव केला –
“हा कलाकार देव आणि मानव यामधला एक माध्यम आहे. वेगवेगळ्या साहित्यांतून देवाचे दर्शन घडवणारा अवलिया आहे.”
त्यांची ही सेवा सलग ४० वर्षे अखंडपणे सुरू आहे. साळीवाडा मित्र मंडळ, त्यांचा परिवार व ग्रामस्थ यांचा मोठा पाठिंबा या कार्यामागे उभा आहे.
पुरस्कार व गौरव

देवीदास गोरे यांच्या कलाकृतींची दखल थेट एबीपी माझा या वृत्तवाहिनीने घेतली असून, शेती साहित्यापासून साकारलेल्या गणेशासाठी त्यांना उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम देखाव्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रेरणा घेण्याजोगी परंपरा –
आजवरच्या प्रत्येक मूर्ती ही नवीन विचार, सामाजिक संदेश आणि कलात्मकतेचे अद्वितीय मिश्रण आहे. कुठल्याही प्रकारची नक्कल न करता सर्जनशीलतेच्या जोरावर घडवलेले हे उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने समाजजागृतीची मूर्ती आहे.हे सगळं करण्यासाठी साळीवाडा मित्र मंडळ आणि परिवाराचा खूप मोठा सपोर्ट असतो.