चंदनापुरीच्या साई मंदिरातील चांदीच्या पादुका चोरी

0
15

संगमनेर तालुका पोलिसांकडून तिघांना अटक

संगमनेर
( युवावार्ता प्रतिनिधी)-
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील साईबाबा मंदिरातील चांदीच्या पादुका चोरी प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट तपास करून तिघा आरोपींना अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 ते 30 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3.25 या कालावधीत चंदनापुरी येथील साईबाबा मंदिराच्या गाभार्‍यात ठेवलेल्या साईबाबांच्या पालखीतील चांदीच्या पादुका तसेच मंदिराच्या आवारात झोपलेल्या साक्षीदार संजय गाडेकर यांचा मोबाईल चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडून चोरी केला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासात कोणताही ठोस धागा नसताना आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू ठेवण्यात आला.


तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी श्रीरामपुरातील वॉर्ड क्रमांक 2, एकता चौक परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. छाप्यावेळी आरोपी प्रशांत दीपक मावस (रा. खांडगाव, गणेशवाडी, ता. संगमनेर) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासह रोहित विठ्ठल साळवे (रा. जोशीवाडी, बिल्लोरी, ता. सिन्नर, जि. नाशिक) व आतुल संजय बटवाल (रा. राजापुर रोड, ढोलेवाडी, ता. संगमनेर) यांना अटक करण्यात आली.
पोलिसी चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली. तसेच चंदनापुरी घाटामध्ये बंद पडलेल्या वाहनावरील चालक हरिष सोनार (रा. सिन्नर, जि. नाशिक) यास कोयत्याचा धाक दाखवून त्याचा मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्याचेही त्यांनी मान्य केले.

सखोल तपासात आरोपींनी चोरलेल्या 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका (किंमत 90,000 रुपये) या संगमनेर येथील सोनार सिद्धेश संदीप महाले यास विकल्याची माहिती दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली 70,000 रुपये किंमतीची मोटारसायकल (एम एच-12-एल के-9076), तसेच चालक हरिष सोनार यांचा 20,000 रुपये किंमतीचा मोबाईल व 2,000 रुपये रोख असा एकूण 1,82,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींना गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या या गुन्ह्याचा तपास जलदगतीने व चिकाटीने करून संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बी. वाय. टोपले, ए. के. आरवडे, एस. के. उगले, पी. एस. चव्हाण, पी. व्ही. बढे, बी. के. शिरसाठ आदी अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सहायक फौजदार बी. वाय. टोपले हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here