भोजदरी शाळेत शिक्षकांचा तुटवडा

0
139

ग्रामस्थांचा शाळा बंद करण्याचा इशारा

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर -तालुक्याच्या पठार भागातील डोंगर दर्‍यात अतिशय दुर्गम भागात वसलेल्या भोजदरी गावात जिल्हा परिषदेची 1 ली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत मंजूर चार शिक्षक संख्या असताना गेल्या दीड वर्षापूर्वी एका शिक्षकांची व आता एका शिक्षकाची बदली झाली. त्यानंतर दोनच शिक्षकांवर या सात वर्गांची जबाबदारी आहे. याबाबत नागरिकांनी शासन प्रशासन स्तरावर वेळोवेळी शिक्षकांची मागणी करुनही शिक्षक उपलब्ध होत नसल्याने अखेर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवित विद्यार्थ्यांचे सोमवार दि. 22 सप्टेंबर रोजी दाखले काढून शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

भोजदरी गावात पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. बदली प्रक्रियेत मंजूर चार शिक्षक असलेल्या शाळेत फक्त दोनच शिक्षक शिल्लक राहिल्याने त्यांच्यावर सात वर्गांची जबाबदारी आहे. त्यात शिक्षकांना शासकीय कामे व शैक्षणिक कामे त्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून भवितव्य धोक्यात आहे. म्हणून ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी, बिडीओ, अकोलेचे आ. किरण लहामटे, संगमनेरचे आ.अमोल खताळ यांना माहिती देऊन निवेदने दिली. मात्र या गोष्टीची कुणीही दखल घेत नाही. मुलांच्या भवितव्याशी खेळले जात असून मुलांचे भवितव्य धोक्यात आहे. म्हणून मुलं फक्त भात खाण्यासाठीच शाळेत जात असतील तर मुल घरी ठेवलेली बरी. जर या गोष्टींची दोन दिवसात दखल घेतली नाही तर सोमवार दि.22 सप्टेंबर रोजी मुलांना शाळेत न पाठविता मुलांचे दाखले काढून शाळेला टाळे ठोकणार असल्याचे पालक पोपट वाळुंज यांनी सांगितले. वेळोवेळी शिक्षकांची मागणी करुनही शिक्षक मिळत नाहीत, ही खेदजनक बाब आहे.

तातडीने यावर कार्यवाही करून शिक्षक द्यावेत, अन्यथा येत्या सोमवारी विद्यार्थ्यांचे दाखले काढून शाळेला टाळे ठोकणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विकास हांडे यांनी सांगितले. दोन शिक्षक सात वर्गांना शिकवित असल्याने आम्ही शाळा बंदचा निर्णय घेत आहोत. दोन दिवसांत अजून दोन शिक्षकांची नियुक्ती करा, अन्यथा शाळेला टाळे ठोकणार आहोत. मुलांचे जे शैक्षणिक नुकसान होणार, याची सर्वस्वी जबाबदारी शासन, प्रशासनाची असेल, असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश पोखरकर म्हणाले. शिक्षकांची मागणी करुनही कोणच दखल घेत नाही. त्यामुळे आम्हाला शाळा बंद करण्याचा व दाखले काढून घेण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे निलेश पोखरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील लोहोकरे, समितीचे पदाधिकारी पोपट वाळुंज, विकास हांडे, बाबाजी हांडे, दिनेश सावंत, जिजाभाऊ भुतांबरे, विजय चव्हाण, रामदास चव्हाण, सिमा शिंदे, अलका वाळुंज, निकीता कोकाटे, सुमन उगले, प्रतिमा वाळुंज, शोभा वाळुंज यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here