बाळासाहेब थोरातांसारखा मोहरा विधानसभेत नाही ही महाराष्ट्राची खंत – खा. संजय राऊत

0
1690

महाराष्ट्र धर्मासाठी थोरातांसारख्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे रहा – संजय राऊत

संगमनेर ( प्रतिनिधी)- सहकार, ग्रामीण विकास ,दूध व्यवसाय, आर्थिक समृद्धी, कृषी, शिक्षण आणि निळवंडे धरणाचे पाणी देऊन या भागामध्ये समृद्धी निर्माण करण्याचे काम माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सतत जनतेसाठी काम करणाऱ्या या नेतृत्वाने तालुक्याला राज्यात एक नंबर बनवताना राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले असून त्यांच्यासारखा मोहरा विधानसभेत नसणे ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी खंत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. डीग्रस येथे संत बुवाजी बाबा यांच्या आध्यात्मिक सोहळा यात्रेमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रणजीत सिंह देशमुख, महंत बुवाजी बाबा पुणेकर, उमाजी बाबा पुणेकर, बबन सांगळे, डॉ जयश्रीताई थोरात, शंकर पाटील खेमनर, शिवसेनेचे अमर कतारी, संजय फड, पप्पू कानकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या भागांमध्ये पाणी आणि शिक्षण देऊन या भागाला राज्यात प्रथम क्रमांकाचे बनवले सातत्याने जनतेसाठी काम केले. या विभागाच्या विकासात आणि राज्याच्या विकासात काम करणाऱ्या या नेतृत्व चा पराभव हा कुणालाही मान्य होणार नाही. त्यांनी काय कमी केले होते असा सवाल विचारताना दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा झालेला पराभव हा कुणालाही मान्य नाही. ते विधानसभेत नसणे ही महाराष्ट्राची मोठी खंत असल्याचे त्यांनी म्हटले असून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगले काम राज्य सरकारने केले. कोरोना संकटात महाराष्ट्राला वाचवले. मात्र खोटेपणा आणि गद्दारी करून सरकार पाडले गेले. महाराष्ट्रात आता बदलाची प्रक्रिया सुरू झाली असून आगामी काळामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार असून महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या बुलंद नेतृत्वाच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन करताना जनतेचे काम करणारे हे नेतृत्व असून पैसे वाटणारे येतात आणि जातात त्यांना किंमत देऊ नका असेही ते म्हणाले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, डिग्रस चे हे देवस्थान तालुक्याचे आणि आमचे श्रद्धास्थान आहे. येथे शेकडो बकऱ्यांची बळी देण्याची परंपरा होती. परंतु संत नारायण गिरी महाराज यांचा सप्ताह या ठिकाणी झाला आणि ही प्रथा बंद झाली. मी शिक्षण मंत्री असताना या परिसरामध्ये शाळा सुरू केली आणि त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेऊन काम करत आहेत. निळवंडे धरण आणि कालवे आपण पूर्ण केले हे सर्वांना माहीत आहे. ज्यांचे योगदान नाही ते आता जलनायक म्हणून घेण्यासाठी पुढे येत आहे. परंतु जनतेला खरे माहिती आहे. निळवंडे साठी सतत पाठपुरावा आपण केला.महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मोठा निधी मिळून कामे अंतिम टप्प्यात आणली फक्त उद्घाटन बाकी ठेवले होते. आणि ते त्यांनी केले त्यांचे यामध्ये कोणतेही योगदान नाही असे सांगताना महाविकास आघाडी सरकार बनवण्यामध्ये खासदार संजय राऊत यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली.

शिवाजी पार्कवर लाखो जनतेच्या उपस्थितीमध्ये आपण शपथ घेतली आणि पहिल्याच मिटिंग मध्ये विना अट शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली. 30000 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून ऐतिहासिक काम केले. केंद्रात आणि राज्यात मत चोरी करून सरकार सत्तेवर आले आहे या विरोधात संजय राऊत सातत्याने आवाज उठवत आहे लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे महत्त्वाचे असून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याकरता विरोधी पक्ष महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले असून आगामी काळामध्ये जातीवादी पक्षांना थारा न देता सर्वांनी महाराष्ट्राच्या हिताकरिता मानवता धर्म जोपासत महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले. यावेळी परिसरातील लाखो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here