आ. खताळ यांच्यावर हल्ला, संतप्त महायुतीचा मोर्चा

0
271

आ. खताळांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा – ना. विखे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ हे शहरातील मालपाणी लॉन्स येथे आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. आरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना शुभेच्छा देऊन आपल्या वाहनाकडे जात असताना एका माथेफीरूने मुख्य प्रवेशद्वाराजवळ हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे संगमनेरात मोठा तणाव निर्माण झाला. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा काढण्यात आला.
आमदार अमोल खताळ यांच्यावर प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ (रा. खांडगाव) या तरुणाने हल्ला केल्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान ही घटना समजताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मालपाणी लॉन्स येथील घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोराला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान आ. अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला होता.
संगमनेरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून अशा माथेफिरूवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना देत या पाठीमागे असलेल्या मास्टर माईंड कोण आहे याचा लवकरच छडा लावण्यात येईल असे सांगत संताप व्यक्त करत घटनेचा निषेध केला.

संगमनेर येथे माझे सहकारी, आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. लोकप्रतिनिधीवर कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने सखोल आणि नि:पक्ष चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, ही अपेक्षा.

– आ. सत्यजित तांबे

संगमनेर शहरात आमदार अमोल खताळ यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. पोलिसांनी निपक्षपणे या घटनेची चौकशी करावी व सत्य आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणारे निवेदन पोलिसांमार्फतच प्रसारित करण्यात यावे.

सोमेश्‍वर दिवटे, शहराध्यक्ष, संगमनेर
शहर काँग्रेस कमिटी
अजय फटांगरे,
अध्यक्ष, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी

रात्री घडलेला प्रकार दुर्दवी आहे. लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करायचे आणि जनतेला आपल्या जवळ ठेवायचे. आपल्याला पराभव पचवता येत नाही. लोकशाहीने केलेला पराभव मान्य नाही. तुम्ही कितीही हल्ले करा तेवढ्याच ताकदीने हा सर्वसामान्यांचा आमदार आपल्या मागे भक्कमपणे उभा राहिल. आ. अमोल खताळ एक इंचही मागे हटणारा नाही. आपल्याला विकासाचे राजकारण करायचे. यांना कोणी घाबरायचे नाही. महाविजयी सभेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असा हल्लाबोल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केला.


तर यावेळी बोलतांना आ. अमोल खताळ म्हणाले की, आपण माझ्यावर विश्‍वास टाकला आहे, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला विसरणार नाही. अशा भ्याड हल्ल्याने मी घाबरणार नाही. मी गणेशोत्सवामुळे थांबलो, म्हणून काही आम्ही बांगड्या भरलेल्या नाही. माझ्या कार्यकर्त्यांना हात लावला तर पहिली गाठ माझ्याशी आहे. असा हल्लाबोल आ. खताळ यांनी केला. तर आ. विठ्ठल लंघे म्हणाले, राजकीय द्वेषापोटी आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला आहे. त्याचा मी निषेध करतो. तालुक्यातील चाळीस वर्षाचे प्रश्‍न सोडविण्याचे काम आ. खताळ करत आहे ही पोटदुखी सहन होत नाही. संपूर्ण सरकार आमदार खताळ यांच्या मागे भक्कम उभे आहे. हा हल्ला करणार्या हल्लेखोरांचा मागचा सुत्रधसर शोधा अशी मागणी आ. लंघे यांनी केली. दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नांदूर शिंगोटे ते लोणी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. आजच्या या मोर्चात तालुक्यातील हजारो नागरीकांनी सहभाग घेतला. दरम्यान पोलिसांकडून माहिती देण्यात आली की, याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, राजस्थान युवक मंडळ यांनी आयोजित केलेला संगमनेर फेस्टीव्हल या कार्यक्रमाकरीता आमदार अमोल खताळ हे हजर होते.

सदरच्या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील व आजुबाजुच्या गावातील लोक आलेले होते. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याने जमावाचा फायदा घेवुन हस्तांदोलन करण्याचा बहाणा करुन अचानक आमदार अमोल खताळ यांचेवर हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुन संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. 798/2025 बीएनएस 109, 351(1) प्रमाणे दिनांक. 29.08.2025 रोजी 02.14 वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीत प्रसाद गुंजाळ यास अटक करण्यात आली आहे. तसेच इतर आरोपीचां यामध्ये सहभाग आहे का याबाबत तपास सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख हे करीत आहेत. सदर गुन्हयाचा सखोल तपास सुरु असुन नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवु नये. असे आवाहन पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here