जाणता राजा मैदानाजवळील प्रकार !

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील जाणता राजा मैदानाजवळील युनियन बँकेच्या एटीएममध्ये बुधवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने अत्यंत शिताफीने एटीएम कार्डाची अदलाबदल करून एका वृद्धाची 35 हजार रुपयांची फसवणूक केली. शिवाजी देवीचंद साबळे (राहणार रहिमपूर, तालुका संगमनेर) हे बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. ते पैसे काढत असताना एक अज्ञात इसम त्यांच्या पाठीमागून आला. त्याने साबळे यांचा पिन नंबर पाहिला आणि नंतर त्यांच्या एटीएम कार्डचा ताबा घेतला.

भामट्याने कार्ड हातात घेताच सांगितले की तुमचे कार्ड ओले आहे, त्यामुळे पैसे निघत नाहीत, मी पुसतो असे म्हणत त्यांचे कार्ड बदलून टाकले. साबळे एटीएममधून बाहेर गेल्यावर या इसमाने साबळे यांच्या खर्या कार्डाचा वापर करून 35 हजार 100 रुपयांची रक्कम परस्पर काढली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिवाजी साबळे यांनी तात्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 558/2025 नुसार, भादंडवि कलम 318 (4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.