भेसळ प्रकरणी निर्दोष ठरलेल्या दर्डा बंधूंना अन्याय्य त्रास देणाऱ्यांना इशारा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेरची बाजारपेठ व्यापार्यांच्या त्यागातून व कष्टातून फुलली आहे. सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू आहे. त्यामुळे व्यापार्यांनी आपली एकजूट कायम दाखवावी. जर विनाकारण संगमनेरच्या व्यापार्यांना ब्लॅकमेल करून विनाकारण कोणी त्रास देत असेल तर त्यांचाबंदोबस्त केला जाईल असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला
संगमनेर शहरातील मोहनलाल बन्सी लाल दरडा यांच्यामार्फत एका किरकोळ किराणा विक्री दुकानात भेसळयुक्त गुळ विक्री होत असल्याची तक्रार अहिल्यानगर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाला केली होती त्यानंतर औषध आणि प्रशासन विभागाचे अधिकार्यांनी संगमनेरला येऊन दरडा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळाची तपासणी केली. त्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले त्यात सदरचा गुळ हा प्रमाणित असल्याबाबत तपासात सिद्ध झाले. त्याचा अहवाल प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्राप्त झाले आहे तरीसुद्धा काहीजण दर्डा बंधूंना विनाकारण त्रास देत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आ. अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे.
याविषयी माध्यमांशी बोलताना आ. खताळ म्हणाले की, संगमनेर शहरातील व्यापार्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी वेळोवेळी काळजी घेत आहे. जर संगमनेरचे व्यापारी चुकीचे वागत असतील तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. परंतु विनाकारण जर व्यापार्याला ब्लॅकमेल करून काहीजण त्रास देऊन आपल्या तुंबड्या भरण्याचे काम करत आहे. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. येथून पुढे कोणी व्यापार्यांना ब्लॅकमेल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, व्यापार्यांच्या पाठीमागे राज्यातील महायुती सरकार आणि संगमनेरचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी भक्कमपणे उभा राहील असा विश्वास आ. खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेरच्या व्यापार्यांनी त्यागातून व कष्टातून ही संगमनेरची बाजारपेठ उभी केली आहे त्यामुळे जर चुकीचे काम करणार्यांना अधिकारी पाठबळ देत असतील तर त्या अधिकार्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा आ. खताळ यांनी दिला. व्यापार्यांना कोणी वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना महायुती स्टाईलने उत्तर दिले जाईल. त्यांच्यावर निश्चितच कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना अन्न, औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाला त्यांनी सुचना दिल्या.
येथून पुढील काळात संगमनेर दहशतमुक्त व भयमुक्त होण्यासाठी सर्व व्यापार्यांनी एकत्रित राहुन ही एकजूट कायम दाखवावी असे आव्हान आमदार खताळ यांनी केले.
यावेळी संगमनेर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश कासट, उपाध्यक्ष सुमेध संत, सेक्रेटरी शरद गांडोळे, ओंकारनाथ भंडारी, श्रीगोपाल पडतानी, ज्ञानेश्वर कपर्,े शिरीष मुळे, सुमतीलाल दरडा, संतोष दरडा, विलास दरडा, वैभव दरडा, गुरुनाथ बाप्ते, विशाल पडतानी, आनंद दरडा, आशिष राठी, रवी धात्रक, नितीन गुंजाळ, सचिन शिंदे, सुजित खटोड, गिरिधारी असावा, प्रकाश वालझाडे, प्रशांत कासट, सचिन राठी यांच्यासह संगमनेर शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















