पत्रकारितेत नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन, युवावार्ता परिवाराचा उपक्रम

युवावार्ता (प्रतिनिधी)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून पत्रकारितेतही त्याचे महत्त्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे ‘दैनिक युवावार्ता’ परिवाराच्या वतीने पत्रकार व छायाचित्रकारांसाठी ए.आय.तंत्रज्ञानावरील विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
दि. 10 मार्च रोजी संगमनेर व्यापारी असोसिएशन हॉल येथे आयोजित या कार्यशाळेत मोठ्या संख्येने पत्रकार, छायाचित्रकार व तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्यक्तींनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत इंजि. आनंद हासे आणि इंजि. सुदीप हासे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे ए.आय.च्या विविध उपयोगांची माहिती दिली.

आजच्या डिजिटल युगात माहिती संकलन, बातमी लेखन, मांडणी, संपादन तसेच वेळेची बचत यासाठी ए.आय. अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लॅपटॉप आणि प्रोजेक्टरच्या साहाय्याने त्यांनी विविध उदाहरणे दाखवत पत्रकारितेत ए.आय.चा प्रभावी वापर कसा करता येतो याचे मार्गदर्शन केले. या सत्रामुळे उपस्थितांना आधुनिक पत्रकारितेच्या नव्या शक्यता समजून घेण्याची संधी मिळाली.
संपादक किसन भाऊ हासे यांनी 35 वर्षांपासू ‘संगम संस्कृती’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून तसेच पुढे दैनिक युवावार्ताच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात कृतिशील योगदान दिले आहे. त्यांच्या या दीर्घकालीन कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र आनंद आणि सुदीप हासे समर्थपणे पुढे नेत असून आपल्या व्यवसायासोबत वडिलांच्या पत्रकारितेच्या कार्यातही ते सक्रिय योगदान देत आहेत.

‘युवावार्ता’ परिवाराने आता प्रिंट मीडियाबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही पाऊल रोवले आहे. समाजाला विश्वासार्ह व त्वरित बातम्या देणारे सक्षम न्यूज चॅनलद्वारे डिजीटल क्षेत्रात जोरात कार्यरत होत आहेत. या कार्यक्रमाला डॉ. जी.पी. शेख, मीटकॉन क्षेत्रातील दीपक पावसे, नितीन नवले, संदिप शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपसंपादक संजय अहिरे यांनी केले. छायाचित्रकार काशिनाथ गोसावी, गोविंद गोसावी, संजय क्षत्रीय, सुभाष भालेराव, संतोष डुबे, योगेश काशीद, इद्रीस शेख, उपसंपादक किशोर आव्हाड, सुहास सातपुते, संकेत राजनर, अजय आरणे, मयुर कानवडे, सुदर्शन त्रिभूवन यांच्यासह पत्रकारिता आणि फोटोग्राफी क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन भाऊ हासे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे उपस्थितांनी स्वागत केले तसेच ‘युवावार्ता’च्या न्यूज चॅनल उपक्रमासाठी सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. युवावार्ता बरोबरच महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या प्रश्नांसाठी, संपादक पत्रकारांच्या संघटनांसाठी किसन भाऊ हासे कृतिशील असल्याची प्रतिक्रिया युट्यूबर संजय क्षत्रिय यांनी व्यक्त केली.





















