तिघे अटकेत, 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून बनावट नोटा विक्री करणार्या टोळीतील तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळून नऊ लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना मोबाईलवरून माहिती मिळाली होती की दौडकडून नगर शहराकडे दोन कार व एका मोटारसायकलवरून काही इसम बनावट चलनाच्या नोटांची देवाणघेवाण करण्यासाठी येत आहेत. त्यानुसार सपोनि हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नगर-दौड रोडवरील कायनेटी चौकाजवळ सापळा रचून पांढर्या रंगाच्या मारुती सुझुकी इरटिगा MH-12- SU- 2317,या कारमधील तिघांना पकडण्यात यश मिळवले. त्यांची नावे इंद्रजित बिबीशन पवार (29, रा. शांतीनगर, भोसरी, पुणे), दिपक राजेंद्र भांडारकर (32, रा. शांतीनगर, भोसरी, पुणे) आणि शरद सुरेश शिंदे (29, रा. वरंवडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी आहेत. दरम्यान सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट कारमधील तिघे व मोटारसायकलवरील दोघे मात्र पळून गेले.
पथकाने पंचासमक्ष आरोपी व वाहनांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 500 रुपयांच्या हुबेहुब दिसणार्या 12 नोटा, भारतीय बच्चो का बँक असे छापलेल्या 500 रुपयांच्या तब्बल 100 हून अधिक बंडल, 200 रुपयांच्या नोटांचे 20 बंडल, एक मारुती सुझुकी इरटिगा कार, एक टीव्हीएस स्टार मोटारसायकल आणि चार मोबाईल फोन असा मिळून नऊ लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चौकशीत आरोपींनी पळून गेलेल्या इसमांपैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठे (रा. वासुदे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे सांगितले असून इतर चारजण त्यांना माहीत नसल्याचे सांगितले. ही टोळी बनावट नोटा खर्या असल्याचा भासवून आर्थिक व्यवहार करत लोकांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोपरगाव येथे तब्बल सात लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 179, 180 व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरीष भोये व पोलीस कर्मचारी सुनिल पवार, सुरेश माळी, दिपक घाटकर, हदय घोडके, भिमराज खर्से, आकाश काळे, अमोल कोतकर, बाळु खेडकर, मनोज साखरे व चालक उमाकांत गावडे यांनी सहभाग घेतला.





















