आ. खताळ यांच्याकडून फटांगरे याची तात्काळ हकालपट्टी

संगमनेर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोक करत असताना सर्व राजकीय पक्ष, नेते राजकीय मतभेद बाजूला ठेवून अजित दादा यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. एकीकडे असे असता संगमनेरत मात्र सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्याच एका पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकत अजितदादा पवार यांना या क्षणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती समजतात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. एकीकडे संपूर्ण राज्यभर शोक व्यक्त केला जात असताना सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे वादग्रस्त पोस्ट टाकल्याने त्यांचा सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान वातावरण खराब झाल्याने व पदाधिकाऱ्याची पोस्ट सत्ताधारी पक्षालाही अडचणीत आणणारी ठरल्याने शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या आदेशाने शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे याची तात्काळ शहर प्रमुख पदावरून हाकालपट्टी करण्यात आली.

दरम्यान दिनेश फटांगरे याला जाब विचारून त्याला पोलीस ठाण्यात आणण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट त्याच्या घरी पोहोचले मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता. या विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली. तसेच त्याचा शोध घेऊन आमच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी अनेक कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन बसले होते.

दिनेश फटांगरे हा पहिल्यापासूनच वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. एकत्र शिवसेना असताना त्याला त्या पक्षात कोणतीही किंमत नव्हती मात्र शिवसेनेची फूट पडल्यानंतर त्याची शिवसेना शिंदे गटाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली. मात्र त्याने रात्री, अपरात्री सोशल माध्यमावर नको त्या व्यक्तीविरुद्ध, नको त्या पोस्ट टाकून अनेकांची बदनामी केली. यामध्ये उद्योगपती, राजकीय व्यक्ती, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा कोणाचाही त्याने मुलाहिजा ठेवला नाही. अशा या वादग्रस्त व्यक्तीवर पक्षाने कारवाई करावी, पोलिसांनी कारवाई करावी अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. मात्र त्या राजकीय पाठबळ मिळत असल्याने आजपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. आता मात्र संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना या विकृत दिनेश फटांगरे याने पुन्हा एकदा सोशल माध्यमातून अजितदादा पवार यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट करत गरळ ओकली. त्यामुळे सर्वांचाच संतापाचा बांध फुटला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह सर्व पक्षीय कार्यकर्ते, युवक संघटना यांनी दिनेश फटांगरे यांचा निषेध करत त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याचा शोध घेण्यासाठी सर्व शहर कार्यकर्त्यांनी पिंजून काढले मात्र तो मिळून आला नाही. कार्यकर्ते आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीस ठाण्यात प्रवीण कानवडे, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, सुभाष राहणे, हर्षल राहणे, मनीष माळवे, किरण पाटणकर, आमजद शेख, सुभाष दिघे, विजय पांढरे, किरण घोटेकर, वैशाली राऊत, सरला भूजबळ, भाऊ म्हस्के, रईस पठाण, संध्या खरे, दिनेश डफेकर, गजानन भोसले, प्रसाद गोरे, बाबू आवारी, अभिषेक तांबे, प्रतीक गाडेकर, शुभम डांगे, अक्षय भालेराव, अक्षय आव्हाड, सचिन पवार, तुषार वाळे, दिपक रणशेवरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


















