लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार

0
181

लोककलावंत रघुवीर खेडकर; संगमनेर व अहिल्यानगर जिल्ह्याचा अभिमान – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राला लोककलांची मोठी परंपरा असून स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा घेऊन लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर समर्पित भावनेने तमाशाच्या माध्यमातून सेवा केली असती त्यांना मिळालेल्या पुरस्कार हा संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी गौरवास्पद असल्याचे महाराष्ट्राचे माजी महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

लोककलावंत रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनंदन करताना लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, रघुवीर खेडकर यांनी संगमनेरचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. तमाशा ही जिवंत कला आहे आणि या कलेमध्ये आयुष्यभर समर्पित भावनेने त्यांनी काम केले. स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा त्यांनी जोपासला. आधुनिक युगात तमाशा ही लोककला लोप पावते की काय अशी भीती निर्माण झाली. मात्र आपल्या सशक्त अभिनय आणि लोककलेप्रतीची आस्था यामधून त्यांनी महाराष्ट्रभर तमाशा ही लोककला सुरू ठेवली आज सुमारे 300 लोकांची उदरनिर्वाह त्यांच्या तमाशा फडाच्या माध्यमातून सुरू असून महाराष्ट्र राज्य तमाशा फड संघटनेचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले आहे.

तमाशा कलावंतांच्या व लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. याच बरोबर एक माणूस म्हणून कायम सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. त्यांचा सन्मान हा एक सच्चा कलावंताचा सन्मान असून संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

रघु भाऊ या नावाने परिचित असलेले रघुवीर खेडकर हे संगमनेरकरांचे आवडते व्यक्तिमत्व. कलेबरोबर अध्यात्माच्या माध्यमातूनही त्यांनी जनतेची सेवा केली. आयुष्यभर लोककलेची प्रामाणिक असणाऱ्या सच्चा कलावंताचा हा सन्मान असल्याचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.

तमाशाचा फड सांभाळताना राज्यभरातील विविध कलाकारांची जबाबदारी रघु भाऊ अत्यंत समर्थपणे सांभाळतात. त्यांच्या विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करतात. कलेच्या माध्यमातून जनसेवा हे त्यांचे व्रत असून त्यांचा सन्मान हा संगमनेर करांसाठी अभिमानास्पद असून योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान झाले असल्याचे गौरव उद्गार आमदार सत्यजित तांबे यांनी काढले आहे.

तमाशा ही महाराष्ट्राची सर्वात लोकप्रिय कला असून यामध्ये समई व थाळी नृत्य करणारे रघु भाऊ हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. त्यांना मिळालेल्या पद्म पुरस्काराने लोककलावंतांची दिल्ली दरबारी दखल झाली असून अशा लोकप्रिय आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या रघु भाऊ खेडकर यांचा संगमनेर तालुक्यातील युवकांना मोठा अभिमान असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here