निवडणूक निकाल न पटल्याने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह लावू नका – आमदार सत्यजीत तांबेंचा राज्यातील “युवा नेत्यांना” टोला?

0
956

राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत असताना काही विरोधी पक्षांतील युवा नेते आपल्या अपयशाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत आहेत का? असा स्पष्ट रोख या ट्विटरवरुन जाणवत आहे.
आमदार तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महापालिका निवडणुकीचा निकाल समोर येत असतानाच अनेक पक्षांमधील ‘युवा नेते’ आपल्या अपयशाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडत आहेत. हे नेते आपल्या पक्षातीलच त्या उमेदवारांचा अपमान करत आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून जनतेचा विश्वास संपादन केला आणि निवडणुकीत विजय मिळवला.”

ते पुढे म्हणतात, “केवळ आपल्या मनासारखा निकाल लागत नाही म्हणून लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे केवळ निवडून आलेल्या उमेदवारांचा नव्हे, तर मतदान करणाऱ्या जनतेचाही अपमान होतो.”
सध्या राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये भाजपा आणि महायुतीला यश मिळताना दिसत असून विरोधकांमधील काही युवा नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबेंनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
राजकीय मतभेद असले तरी लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आवश्यक असून, निकाल स्वीकारण्याची परिपक्वता प्रत्येक नेत्याने दाखवावी असा स्पष्ट संदेश आमदार तांबे यांच्या या ट्विटमधून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here