प्रभाग 1 ब, 2 ब आणि 15 ब मध्ये प्रचाराला पुन्हा वेग

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे – संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील तीन प्रभागात पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. या तीन प्रभागात शनिवारी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर संपूर्ण मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक एक ब, दोन ब, 15 ब या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेमुळे मतदानाला अवघे 48 तास शिल्लक असतानाच येथील निवडणूक स्थगित झाली होती. आता ही स्थगित झालेली निवडणूक शनिवारी होऊ घातली आहे. दरम्यान या तीनही प्रभागातील उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचार केला होता. अनेक वेळा मतदारांच्या गाठीभेटीसाठी झाल्या होत्या. मोठी यंत्रणा आणि पैसे देखील खर्च केले होते. मात्र ऐनवेळी निवडणूक रद्द झाल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका आणि मानसिक त्रास देखील या उमेदवारांना झाला. आता पुन्हा एकदा या प्रभागात थंडावलेला प्रचार जोर पकडून लागला आहे. प्रचाराला आता अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवार पुन्हा एकदा मतदारांच्या गाठीभेटीसाठी व्यस्त झाले आहे. सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे व महायुतीचे प्रमुख आ. अमोल खताळ यांची प्रचार यंत्रणा या तीनही प्रभागात सक्रिय होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी व 27 नगरसेवक पदासाठी याआधी या तीन प्रभागात चांगले मतदान पार पडले होते.
प्रभाग एक ब मध्ये सेवा समितीचे उमेदवार दिलीपराव पुंड व महायुतीचे उमेदवार मुन्ना पुंड यांच्यात दुरंगी सामना रंगणार आहे. तर सेवा समिती, महायुती आणि राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. सेवा समितीच्या अर्चना दिघे, महायुतीच्या इंदिरा नामन व राष्ट्रवादीच्या सुवर्णा मस्के मैदानात आहेत. तर प्रभाग 15 ब मध्ये सेवा समिती विरुद्ध अपक्ष अशी लढत होत आहे. या ठिकाणी महायुतीचा कुठलाही उमेदवार नसल्याने व माजी उपनगराध्यक्ष इसहाखान पठाण यांच्या पत्नी येथून उमेदवारी करीत असल्याने या प्रभागाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील अनेक वर्षानंतर संगमनेरात पहिल्यांदाच चुरशीची लढत होताना दिसत आहे. सत्ता परिवर्तनानंतर महायुतीची ताकद वाढली आहे. त्यामुळे यावेळी महायुती किती प्रभावी ठरणार व पालिकेतील अनेक वर्षापासूनचे सत्ताधारी असणारे काँग्रेसला म्हणजेच सेवा समितीला किती मोठा धक्का देणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने व निवडणूक आयोगाने मतदान पूर्व अंदाज वर्तविण्यात मनाई केली असली तरी शहरातील विविध भागात आता निकालावर वेगवेगळ्या अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रभागात हा उमेदवार सरस ठरणार, त्या प्रभागात त्याला फटका बसणार, या प्रभागात गडबड होणार, या प्रभागात सत्ताधार्यांना मोठी टक्कर मिळणार अशा प्रकारचे अनेक तर्क वितर्क सध्या विविध ठिकाणी लावले जात आहे. सेवा समितीने आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड नियोजन करून आपली संपूर्ण यंत्रणा राबवून या निवडणुकीत मोठी हवा निर्माण केली आहे. अनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार आणि काही नवीन चेहरे उभे केले आहे. मतदारांच्या नाराजी, बंडखोरांच्या नाराजी दूर करण्यात देखील सेवा समितीला यावेळी यश आले आहे. 30 प्लस एक असा नारा सेवा समितीने दिला आहे. दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांनी देखील महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीत मोठे आव्हान उभे केले आहे. परंतु महायुती एक संघ ठेवण्यात शेवटपर्यंत आमदार अमोल खताळ यांना यश आले नाही. राष्ट्रवादी स्वतंत्र लढली, भाजपाचीही अंतर्गत नाराजी शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे महायुती या निवडणुकीत कसे यश मिळवणार याकडे देखील मतदारांची लक्ष लागले आहे.
ही निवडणूक तांबे – थोरात परिवारासाठी, काँग्रेससाठी मोठी प्रतिष्ठेची बनली आहे. तर विधानसभेला मिळालेले यश कायम टिकवण्यासाठी अमोल खताळ यांचा सुद्धा यावेळी कस लागला आहे. दोन्ही बाजूने ही निवडणूक अतिशय जिद्दीने आणि प्रतिष्ठीची करून लढविली गेल्याने या निवडणूकीनंतर संगमनेरच्या राजकीय क्षेत्राला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





















