माणसांचा जीव इतका स्वस्त आहे का? बिबट्यांची नसबंदी करा – आमदार तांबे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या काही दिवसांमध्ये 12 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. बिबट्यांच्या पासून दहशतमुक्तते करता संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन सरकार विरोधात आंदोलन केले. बिबट्यांची मोजणी करून सर्वांची नसबंदी करा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली तर महिला, विद्यार्थी यांना भयमुक्त करण्यासाठी शासनाने बिबट्यांबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली.
कोणतेही राजकारण न करता बिबट्यांचे हल्ले थांबवले जावे आणि प्रशासनाला जाग यावी या हेतूने संगमनेरकर जनतेने जनआक्रोश आंदोलन केले. मात्र या आंदोलकांकडून निवेदन घ्यायला शासकीय अधिकारी जनतेकडे यायला तयार नव्हते त्यामुळे आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांसह रस्त्यावरच ठिय्या मांडला. हा कोणाचा व्यक्तिगत प्रश्न नाही, हा जनतेच्या रक्षणाचा विषय आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दररोज नागरिकांची जीव जात आहेत आणि प्रशासन मात्र प्रोटोकॉल प्रोटोकॉल खेळत बसले आहेत असा घणाघात आ. सत्यजीत तांबे यांनी केल्यानंतर प्रांताधिकारी अरूण उंडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले.

संगमनेर बसस्थानक येथे बिबट्याच्या दहशतमुक्ततेसाठी मोठे जनआक्रोश आंदोलन झाले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, पांडुरंग पा. घुले यांच्यासह संगमनेर तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व युवक, महिला उपस्थित होत्या.
या मोर्चामध्ये सिद्धेश कडलक याचे लहानगे सर्व वर्गमित्र सहभागी झाले होते. बिबट्या हटाव, माणूस बचाव, बिबट्या मुक्त तालुका झालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी बोलताना आ. सत्यजित तांबे म्हणाले की, बिबट्या आता जंगल सोडून शेतामध्ये वावरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. शेतामध्ये काम करताना शेतकरी आणि महिला घाबरत आहे तर लहान मुलांचे अंगणामध्ये खेळणे सुद्धा बंद झाले आहे. दररोज बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असताना सरकार मात्र उदासीन आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत आपण केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन नसबंदी करण्याची मागणी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले पट्ट्यामध्ये बिबट्यांचे मोठे प्रमाण असून राज्य शासनाने नसबंदी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याचबरोबर पकडलेल्या बिबट्याना दूर नेऊन सोडले पाहिजे. नागरिकांचे जीव जात असताना प्रशासन मात्र असंवेदनशील झाले आहे. नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी द्यावी तसेच शेतकर्यांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीची परवानगी द्यावी अशी मागणी आ. तांबे यांनी केली.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यापासून दहशतमुक्ती करण्यासाठी सातत्याने आंदोलन होत आहे. मागील एका वर्षामध्ये 12 नागरिकांनी जीव गमावले असून अनेक नागरिक जखमी झाले. आजच्या मोर्चामध्ये आम्ही राजकीय पदाधिकारी नाही तर आई म्हणून आलो आहोत. सिद्धेश कडलग आणि इतर बिबट्यांच्या हल्ल्याबद्दल मृत कुटुंबीयांची काय अवस्था असेल याची कल्पना प्रशासनाला नाही त्यामुळे प्रशासन उदासीन आहे. संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका असून अनेक शेतकरी महिला शेतामध्ये काम करतात बिबट्यांमुळे त्यांच्यामध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. हे सर्व बिबटे पकडा आणि गुजरात मधील वन तारामध्ये नेऊन सोडा याचबरोबर कायमस्वरूपी प्रभावी बंदोबस्त करा अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चासाठी ग्रामीण भागातून नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















