‘एक गाव – एक पाणवठा’ आंदोलनाचे प्रणेते, श्रमिक, शेतकरी आणि कामगारांचे हक्क राखणाऱ्या लढवय्या नेत्याला श्रद्धांजली

युवावार्ता (प्रतिनिधी)-
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील भीष्मपितामह, कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांचा बुलंद आवाज, तसेच ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीचे प्रणेतेडॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (बाबा आढाव) यांचे आज (सोमवारी) रात्री दुःखद निधन झाले. पुना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा एक लढवय्या आणि पुरोगामी आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बाबा आढाव वार्धक्य आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त होते. प्रकृती अधिक खालावल्याने 10 ते 12 दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
शोषित, वंचित आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे थोर समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन ही केवळ एका व्यक्तीची हानी नाही, तर समाज परिवर्तनाच्या एका तेजस्वी युगाचा अस्त असल्याची वेदना आहे. समाजातील अन्याय, शोषण आणि विषमतेविरोधात निर्भीडपणे उभे राहणारा संघर्षशील विचार आज शांत झाला असला, तरी बाबा आढाव यांनी पेटवलेली परिवर्तनाची ज्योत अजूनही असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात अखंड तेवत राहणार आहे. बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकरी, कामगार, भटक्या-विमुक्त, महिलां व शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी झोकून दिले. त्यांनी कधीही आरामाचे, पदाचे किंवा सत्तेचे स्वप्न पाहिले नाही. अन्याय सहन न करणारी वृत्ती, स्पष्ट भूमिका आणि संघर्षाची धार हेच त्यांचे आयुष्य होते. “शोषणमुक्त समाज” हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी संघटन, आंदोलन आणि जनजागृतीच्या माध्यमातून सातत्याने कार्य केले.
कामगार हक्क, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा यासाठी त्यांनी उभारलेली आंदोलने ही इतिहासाच्या पानांत नोंदली जाणारी आहेत. कष्टकऱ्यांच्या घामाला किंमत मिळावी, मजुरांना न्याय मिळावा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळावा, यासाठी बाबा आढाव आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत झटले. त्यांची भाषा साधी होती, पण विचार धारदार होते. सामान्य माणसाच्या वेदना त्यांनी स्वतःच्या मानल्या आणि त्या वेदनांना आवाज दिला. समाजातील तरुणांना त्यांनी नेहमीच विवेक, संघर्ष आणि मूल्याधिष्ठित चळवळीचा मार्ग दाखवला. “चळवळ म्हणजे केवळ घोषणा नव्हे, तर जीवनपद्धती आहे,” हा त्यांचा विचार आजही प्रेरणा देणारा आहे. सामाजिक कार्य म्हणजे केवळ मदत करणे नव्हे, तर अन्यायाच्या कारणांवर प्रहार करणे, हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले.
बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित आणि वंचितांसाठी वेचले. 1970 च्या दशकात पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली होती. समाजवादी पक्षाचे सदस्य असलेल्या बाबांनी हमाल, रिक्षाचालक आणि कष्टकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी ‘रिक्षा पंचायत’ आणि ‘हमाल पंचायत’च्या माध्यमातून मोठे काम उभे केले. विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी राबवलेली ‘एक गाव एक पाणवठा’ ही मोहीम महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात अजरामर ठरली आहे.
डॉ. बाबा आढाव यांना त्यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये पुण्यभूषण पुरस्कार* (2006), ‘द वीक’ (The Week) मासिकाने दिलेला ‘मॅन ऑफ द इयर’ सन्मान (2007) आणि टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवनगौरव पुरस्कार (2011) यांचा समावेश आहे. त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’, ‘सत्यशोधनाची वाटचाल’ आणि ‘हमाल पंचायत’ यांसारख्या पुस्तकांचे लेखन करून आपले विचार जनमानसांपर्यंत पोहोचवले.
वयोमान वाढले तरी बाबांमधील कार्यकर्ता कधीच थकला नाही. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर, बिघडलेल्या राजकीय संस्कृतीविरोधात वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. सध्याचे राजकारण केवळ सत्तेच्या भुकेने बरबटले असून, सकाळी एकीकडे आणि संध्याकाळी दुसरीकडे अशी नेत्यांची अवस्था झाली आहे. आता 140 कोटी जनतेनेच ठरवावे, असे परखड मत त्यांनी मांडले होते.
बाबा आढाव हे कोणत्याही एका संघटनेपुरते मर्यादित नव्हते; ते संपूर्ण सामाजिक चळवळीचे जिवंत प्रतीक होते. सत्ता, पैसा किंवा प्रसिद्धीपासून ते नेहमीच अलिप्त राहिले. त्यांचा साधा राहणीमान, तत्त्वनिष्ठ जीवन आणि निर्भय भूमिका यामुळे ते सर्वसामान्यांचे खरे नेते ठरले. आज बाबा आढाव आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला विचारांचा वारसा अमूल्य आहे. शोषणाविरोधातील लढा, सामाजिक समतेची आस आणि माणूसपणाची जाणीव हीच त्यांची खरी स्मारके आहेत. त्यांच्या विचारांवर चालणे, अन्यायाविरोधात उभे राहणे आणि कष्टकऱ्यांच्या बाजूने निर्भीडपणे बोलणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
दैनिक युवावार्ता परिवार त्यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या चरणी कृतज्ञतेची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.


















