डिजिटल कॅम्पेन, सह्यांची मोहीम, आणि आता रस्त्यावर आंदोलन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गे व्हावी या करता महारेल विभागाने सर्वेक्षण करून संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांना भूसंपादनाचे पैसेही दिले. पुण्यावरून पुणतांबा करणार्या या रेल्वे मार्गाला संगमनेर, सिन्नर, जुन्नर, नारायणगाव येथील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून या विरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाणार आहे. या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्यात सह्यांची मोहीम व डिजिटल कॅम्पिंग सुरू झाली आहे.
संगमनेर तालुका वैभवशाली बनवताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याच्या शेजारी काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी योगदान दिले. याचबरोबर तालुक्याच्या उत्तरेकडून समृद्धी महामार्ग जातो आहे. नव्याने सुरत – हैदराबाद महामार्गाचे भूसंपादन तालुक्यातून झाले आहेत. निळवंडे धरण पूर्ण करून उजवा व डाव्या कालव्यातून तालुक्याला पाणी मिळत आहे. शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आहे. नाशिक- पुणे महामार्गाची चौपदरीकरण झाले असून काँक्रीटचे काम पूर्णत्वास जात आहे. याचबरोबर विकासाला चालना देणारी नाशिक -पुणे रेल्वे संगमनेर मधून व्हावी याकरता सर्व काम अंतिम टप्प्यात आले होते.

नाशिक – पुणे रेल्वे ही सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण या मार्गाने झाली पाहिजे त्यासाठी माझा सातत्यपूर्ण संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष राजकीय नाही, एक संगमनेरकर म्हणून संगमनेर व परिसराच्या पुढील 100 वर्षांच्या वाटचालीसाठी मी लढतो. या लढ्यात आपणही सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून सामील व्हावे असे मी सर्वांना आवाहन करतो. नाशिक – शिर्डी रेल्वे झाली पाहिजे, अहिल्यानगर – पुणे रेल्वे झाली पाहिजे हे आमचंही आग्रही मत आहे. पण त्यासाठी नाशिक – पुणे रेल्वेचं कंबरडं मोडू नये… सिन्नर, संगमनेर, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, खेड या भागाच्या विकासाचा बळी देऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक – पुणे रेल्वे शिर्डीमार्गे वळवण्यासाठी दिलेलं तांत्रिक कारण म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. मोठमोठे रेडिओ टेलिस्कोप जवळून रेल्वे प्रकल्प झाल्याची अनेक उदाहरणं जगभरात आहेत, त्यांचा अभ्यास न करता आमच्या विकासाचा बळी देणं अत्यंत दुर्दैवी आहे, अन्यायकारक आहे. या अन्यायाच्या विरोधात आपण सर्व संगमनेरकरांनी एकत्र येऊन लढण्याची, आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे. यासाठी आपण सर्वांनी वरील क्युआर कोड स्कॅन करून रेल्वे मंत्रालयाला ईमेल करावा, आपली भूमिका मांडावी. आपलं प्रत्येक पाऊल आपल्या लढ्याला बळ देणारं आहे, हे पाऊल टाकण्याची हीच योग्य वेळ… कारण – अभी नहीं तो कभी नहीं !
मेल करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून मेल पाठवा किंवा क्युआर कोड स्कॅन करावा.
लिंक: https://tinyurl.com/pnrailwayopp
- आमदार सत्यजीत तांबे
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये घोषणा करताच संपूर्ण संगमनेर विभागामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी तातडीने संगमनेरकरांची बैठक घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात जन आंदोलन उभारण्याची मोठी घोषणा केली. याबाबत त्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी तातडीने संपर्क साधला तर सिन्नरचे आमदार क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ, जुन्नरचे शरद सोनवणे, ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील, बाबाजी काळे यांच्याशी संपर्क साधून नाशिक – पुणे रेल्वे ही सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड, चाकण अशीच जावी याकरता तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. खरे तर विद्यमान सरकार व महायुतीतील लोकप्रतिनिधी यांनी या निर्णयाला विरोध करायला पाहिजे मात्र आता तसे न करता त्यांनी गुळगुळीत भूमिका घेतली आहे. संगमनेर तालुक्याची अस्मिता जपण्याकरता सर्वांनी राजकीय जोडी बाजूला ठेवून या जनआंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रेल्वे कृती समितीने केले आहे. निळवंडे धरण व कालवे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले. मात्र उद्घाटनाचे श्रेय घेण्याचा इतरांनी प्रयत्न केला. नाशिक – पुणे रेल्वे साठी त्यांनी पाठपुरावा केला मात्र सत्ता बदलताच ही रेल्वे शिर्डी मार्गे पळवली गेली. संगमनेर मधील सभेमध्ये आमदार सत्यजित तांबे म्हणाले की संगमनेरचे पाणी पळवण्याचा पूर्वेकडच्या नेत्यांचा डाव असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक पुणे रेल्वे करता पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांना न सांगता शेजारच्यांना सांगावे. याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले होते की रेल्वे सुद्धा खेचून आणू.
नाशिक- पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी याकरता संगमनेर तालुक्यामध्ये सर्व विद्यार्थी नागरिक महिला युवक यांच्यामध्ये सह्यांची मोहीम सुरू झाली असून डिजिटल कॅम्पिंग सुद्धा सुरू झाली आहे. याचबरोबर ऑनलाइन पिटीशन सुद्धा दाखल करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये तरुणाईचा मोठा सहभाग राहणार असून सर्वांनी संगमनेर रेल्वे साठी एकत्र यावे अभि नही तो कभी नही असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शासकीय एमआयडीसीची मागणी एप्रिल 2025 मध्ये साकुर, बोटा परिसरामध्ये केली होती त्यानुसार त्या ठिकाणी सर्वेचे काम सुद्धा सुरू झाले आहे. संगमनेरमध्ये सहकारी एमआयडीसी 100 एकरवर सुरू आहे त्यामध्ये 400 प्रोजेक्ट असून सुमारे दहा हजार कर्मचारी काम करत आहे. व्यापारी आणि औद्योगीकरणाच्या दृष्टीने संगमनेर वरून जाणारी रेल्वे ही विकासाला मोठी चालना देणारी ठरणार आहे.


















