संगमनेर नगरपरिषदेसाठी विक्रमी 72.75 टक्के मतदान

0
133

ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले सिंह आणि धनुष्यबाणाचे भविष्य

छोटो अपवाद वगळता मतदान सुरळीत; नगराध्यक्षपदाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

राष्ट्रवादीची भमिका ठरणार महत्वाची

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, मतमोजणीच्या तारखेबाबत आता मोठा संभ्रम निर्माण दूर झाला आहे. सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने आपल्या कार्यक्रमात बदल करत, ज्या ठिकाणी वाद सुरू आहे, तेथे 20 डिसेंबर मतदान व 21 डिसेंबरला निकाल असा नवीन आदेश देऊन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार 3 डिसेंबरची मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. आता 21 डिसेंबरलाच सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत शहरातील सर्व १५ प्रभागांतील मतदारांनी आज मंगळवारी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नगरपरिषद क्षेत्रात एकूण ५७,७१४ मतदार असून यात २८,३९० पुरुष आणि २९,३२४ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागात स्वतंत्र मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून सकाळी संथ गतीने मतदान झाले. परंतु दुपारनंतर काही मतदान केंद्रांवर रांगा दिसू लागल्या.
दरम्यान शहरातील काही प्रभागात सेवा समिती व महायुती कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे किरकोळ घटना घडल्या. शहरातील हायस्कूल मतदान केंद्रात मतदान करण्यावरून दोन गटात चांगलीच बाचाबाची झाली. किरकोळ हाणामारीची घटना देखील या ठिकाणी घडल्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर पसरले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सेवा समिती आणि महायुती या दोन्ही बाजूने आज अनेक केंद्रावर मतदार आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धावाधाव केली जात होती यावरूनही काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाल्याच्या घटना समोर आले आहे मात्र एकूणच संगमनेर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
प्रभागनिहाय पाहता, प्रभाग क्रमांक १ मध्ये ३४८०, प्रभाग २ मध्ये ३३०५, प्रभाग ३ मध्ये २५७६, प्रभाग ४ मध्ये ३३९३, प्रभाग ५ मध्ये ३१५५, प्रभाग ६ मध्ये ३२०६, प्रभाग ७ मध्ये ३९४७, प्रभाग ८ मध्ये ३२७७, प्रभाग ९ मध्ये ५२६७, प्रभाग १० मध्ये ४१७७, प्रभाग ११ मध्ये ४८०८, प्रभाग १२ मध्ये ४६७१, प्रभाग १३ मध्ये ३८७९, प्रभाग १४ मध्ये ३९३२, तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये ४६४१ इतके एकूण मतदार नोंदणीकृत आहेत.
मतदानाची सुरुवात सकाळी शांततेत झाली असून पहिल्या टप्प्यात म्हणजे सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत ८.८८% मतदान झाले. त्यानंतर मतदारांनी मतदानासाठी चांगली गर्दी केली आणि सकाळी ११.३० पर्यंत मतदानाचा टक्का २१.६५% वर पोहोचला. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग आणखी वाढला आणि दुपारी १.३० वाजेपर्यंत २०,९६५ मतदारांनी मतदान करून मतदानाचा टक्का ३६.३३% इतका झाला.
आज मतदानाच्या दिवशी अनेक भागात मतदारांना लक्ष्मी दर्शन घडून आले त्यामुळे देखील मतदानामध्ये उत्साह निर्माण झाल्याने मतदानात वाढ होताना दिसली.


दरम्यान शहरातील प्रभाग – क्रमांक 1 ब, प्रभाग क्रमांक 2 ब . प्रभाग क्रमांक 15 ब या तीन ठिकाणी आज मंगळवारी मतदान झाले नाही. या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया 4 तारखेपासून सुरू होणार असून 20 डिसेंबरला मतदान व 21 तारखेला मतमोजणी होणार आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी 275 पोलिस कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी 57 हजार 714 मतदार आहेत. यात 28,390 पुरुष तर 29, 324 महिला मतदार आहे. 15 प्रभागात 27 जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडत असून महिला मतदारांची संख्या अधिक आहे. याचा फायदा कुणाला मिळणार हे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
आजची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी शहरात 60 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर 360 कर्मचारी तैनात करण्यात आले. तर 60 अतिरिक्त राखीव कर्मचारी देखील तयार ठेवण्यात आले होते. इतरही 200 कर्मचारी या मतदान प्रक्रियेत मदत करण्यासाठी तयार ठेवण्यात आले होते. दरम्यान, संगमनेर येथील निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यंदा पहिल्यांदाच काँग्रसचे चिन्ह मतदान यंत्रात नव्हते.


संगमनेर नगर परिषदेसाठी तब्बल नऊ वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. त्यातच विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाल्यामुळे संगमनेर नगरपरिषद आपल्या ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेली सेवा समिती या दोघांनाही विजयासाठी प्रचंड जोर लावावा लागला. संगमनेर सेवा समितीने नगराध्यक्ष पदासाठी सौ. मैथिली सत्यजित तांबे यांना तर महायुतीने आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी श्रीमती सुवर्णा संदीप खताळ यांना उमेदवारी दिली. सेवा समितीने तिसही प्रभागात सिंह या चिन्हावर आपले उमेदवार उभे करत या निवडणुकीत एक भूमिका, एक निशाणी आणि एक विचार या बळावर निवडणुकीला सामोरे गेले. तर दुसरीकडे महायुती मात्र 15 प्रभागापैकी काही ठिकाणी उमेदवार देऊ शकले नाही. या ठिकाणी अपक्षांना पाठिंबा देऊन त्यांनी निवडणूक लढवली. आमदार सत्यजित तांबे यांनी सेवा समितीच्या माध्यमातून 2.0 हे व्हिजन मतदारांपुढे मांडून मतदानाचे आवाहन केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेला जी चूक आपल्याकडून झाली व आपण केली ती पुन्हा करू नये असे भावनिक आवाहन केले. या निवडणूक प्रचारात मतदारांना गेल्या 40 वर्षात केलेला विकास आणि पुढील काळात करावयाची कामे याचे व्हिजन बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी मांडून शहरात एक प्रकारे वातावरण तापवले. नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि मुद्देसूद प्रचार केल्याने सत्यजित तांबे यांचे नेतृत्व मात्र उजाळून निघाले. तरुणांची मोठी फळी त्यांनी संघटित केली. अनेक नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना आपल्या सोबत घेतले. मित्रपक्षांचा मान ठेवत त्यांनाही संघटित करून एकत्रित सेवा समिती म्हणून ते या निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे गेले. सोबत मा.आ.डॉ. सुधीर तांबे, मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात आणि सर्वच कार्यकर्त्यांनी जोर लावल्यामुळे एकीचे मोठे दर्शन या निवडणुकीत झाले.
महायुतीत मात्र काहीसा एकतेचा अभाव प्रकर्षाने आढळून आला. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आपली वेगळी चूल मांडली तर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याने त्याचा मोठा फटका देखील यावेळी महायुतीला बसण्याची शक्यता आहे. उमेदवारी नाकारणे, चुकीची उमेदवारी देणे, नगराध्यक्ष पदावरून निर्माण झालेला तिढा वेळेत न सुटणे, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे अशा अनेक घटना महायुतीत घडल्याने महायुतीत काहिसा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र तरीही आमदार अमोल खताळ यांनी एकहाती किल्ला लढवत निवडणुकीत रंग भरले. स्वतः प्रत्येक ठिकाणी प्रचार सभा घेत मतदारांना एक वर्षात केलेले कामे व यापुढे करणार असलेल्या कामांची ग्वाही दिली. 40 वर्षात राहिलेल्या बॅकलॉग आपण भरून काढू असे आवाहन करताना विधानसभेप्रमाणे नगरपालिकेतही परिवर्तन हवे असल्याचे ठासून सांगितले. उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराने महायुतीच्या गोटामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. कॉर्नर सभा घेऊन आमदार अमोल खताळ यानीही संगमनेर पिंजून काढले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीने युतीच्या उमेदवारांना बळ मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपांच्या फैरी एकमेकांवर झाडण्यात आल्या. डॉ. मैथिली तांबे आणि श्रीमती सुवर्णा खताळ या दोन्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे भवितव्य 21 तारखेच्या निकालात कळेल. अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या उमेदवारांनीही या निवडणुकीमध्ये वेगळी रंगत आणली. शेवटपर्यंत राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाला पाठिंबा कोणाला हे सांगितले नाही त्यामुळे निवडणुकीत चुरस दिसून आली.

प्रभाग क्र. 3 मधील सौरभ कासार, मुकेश मुर्तडक, मिलींद अभंग लढत
प्रभाग क्र. 5 मधील विश्वास मुर्तडक आणि रविंद्र म्हस्के लढत
प्रभाग क्र. 7 मधील मालती डाके, पुनम अनाप, पुजा कतारी लढत
प्रभाग क्र. 8 मधील श्रीगणेश गुंजाळ, प्रकाश राठी लढत – पायल ताजणे, दिपाली पंचारिया लढत
प्रभाग 11 मधील दानिश खान, जावेद जहागिरदार लढत
प्रभाग 13 मधील कविता कतारी, साक्षी सुर्यवंशी लढत
प्रभाग 14 मधील प्रसाद पवार, योगेश जाजू यांच्यातील लढतींकडे विशेष लक्ष असणार आहे.


संगमनेर सेवा समिती व महायुती दोन्ही बाजूकडून या निवडणुकी तन-मन, पूर्ण शक्ती खर्च करण्यात आली. त्यामुळे मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह निर्माण झाला. कधी नव्हे ती ही निवडणूक प्रचंड चुरशीची म्हणून गाजली. आता 21 डिसेंबरला होणार्‍या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान शहरातील तीन प्रभागातील तीन वार्डात निवडणूक पुढे ढकलल्याने तेथील उमेदवारांना मोठा धक्का बसला. आता पुन्हा एकदा या तीन ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर ऐवजी आता 21 डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश आहे. 20 डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here