मुन्ना पुंड यांच्या बाजूने वाढतोय जनतेचा कल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीला संधी मिळत आली. मात्र, आता प्रभागातील जनता बदलासाठी उत्सुक आहे. विकास हवा असेल, समस्या सोडवणारा माणूस हवा असेल आणि निम्म्या रात्री मदतीला धावून येणारा खरा जनसेवक हवा असेल, तर मुन्ना पुंड यांना एक संधी द्या. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी प्रभागातील जनतेला प्रचारा दरम्यान केले.
आ. खताळ म्हणाले, प्रभागात फिरताना मला अनेक गंभीर समस्या दिसल्या. नित्कृष्ट दर्जाचे रस्ते, उघड्या गटारी, अनेक ठिकाणी कचर्याचे ढिगारे, उच्चशिक्षित मुला-मुलींसाठी अभ्यासिकेचा अभाव, तरुणांसाठी व्यायामशाळा नाही, सुशोभीकरणाचे काम थांबलेले आणि श्रमिक नगर परिसरातील प्रश्न आजही प्रलंबित.
या सर्व समस्यांना उपाय देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नगररचना विकास खात्यातून प्रभागाच्या विकासासाठी आवश्यक निधी पुरवण्यात कोणतीही कमतरता राहणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. म्हणूनच महायुतीचे उमेदवार मुन्ना पुंड व सौ. मनीषा नेवासकर यांच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन खताळ यांनी जनतेसमोर मोठ्या आवाजात केले.
मनसेचे युवा नेते संकेत लोंढे यांनी प्रभागाच्या विकासाला प्राधान्य देत मन मोठे करून समर्थन जाहीर केले व महायुतीचे पारडे अधिक जड केले. त्यामुळे मुन्ना पुंड यांच्या विजयाचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.
क्रांतीवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुन्ना पुंड यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक उपक्रम राबवले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, रामनवमी यांसारख्या उत्सवांत महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला असून ‘दुर्ग वाहिनी’ या उपक्रमातून महिलांच्या सन्मानाचा व सुरक्षेचा गौरवपूर्ण उपक्रम राबवला जातो.
प्रभागातील सर्वसामान्यांच्या, हॉस्पिटलच्या अडचणी, शैक्षणिक समस्या, वैयक्तिक संकट यावेळी मुन्ना पुंड नेहमी पुढे येऊन मदतीचा हात देतात. जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच माझी खरी संपत्ती आहे. ही निवडणूक माझ्यासाठी सत्तेची नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठीची मोठी संधी आहे, असे मुन्ना पुंड म्हणाले. आ. अमोल खताळ यांनी शेवटी भावनिक आवाहन करत म्हटले प्रस्थापितांनी काम केल्याचा केवळ दिखावा केला पण आता बदलाची वेळ आली आहे. एक संधी मुन्ना पुंड यांना द्या, तुमच्या कामांची जबाबदारी माझी.
मुन्ना पुंड हे तळागाळात सर्वसामांन्यांसोबत काम करणारे तरुण नेतृत्व आहे. पद नसतानाही ते इतके काम करु शकतात तर आपला सेवक म्हणून पालिकेत गेल्यावर प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलुन टाकतील असा विश्वास या प्रभागातील नागरिकांना आहे.

















