घराणेशाही विरोधात वातावरण पेटवणारेच अडकले घराणेशाहीच्या जाळ्यात

0
382

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – चाळीस वर्षे येथील विरोधक घराणेशाहीविरोधात लढतायेत अस सांगून मतं मागणारे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ अवघ्या वर्षभराच्या आत स्वतःच घराणेशाहीच्या जाळ्यात अडकले आहेत. जो मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हॉट ठरणार होता, तो मुद्दा आता संगमनेर मधून सरळ हद्दपार झाला. नगराध्यक्ष पदासाठी आमदार खताळ यांनी स्वतःच्या घरातून उमेदवार दिल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत झाली आहे, आता कोणत्या तोंडाने थोरातांवर टीका करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे? नाराज आणि गोंधळलेले कार्यकर्ते सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपद उमेदवारीमध्ये काही जणांना माघार घ्यावी लागल्यामुळे सोशल मीडिया संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
संगमनेर नगरपरिषदेसाठी अंतिम दिवशी आमदार खताळ यांच्या भावजयी सुवर्णा संदीप खताळ यांनीच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पायल ताजणे, सुजाता देशमुख, रेखा गलांडे यांच्यासारख्या स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून खताळांनी उमेदवारी थेट घरातच नेऊन ठेवली. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अर्ज दाखल झाल्यापासूनच नाराजी उफाळून आली आहे.


विधानसभा निवडणुकीत थोरात कुटुंबावर घराणेशाही म्हणून जे हल्ले झाले, तेच हत्यार घेऊन महायुतीने मोहीम राबवली होती. हा मुद्दा विधनासभेत चालला. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य निवडणुका येताच, सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून थोरात-तांबे कुटुंबावर घराणेशाहीच्या नावाने जोरदार टीका सुरू होती. पण शेवटच्या क्षणी खताळांनीच स्वतःच्या वहिनीला उमेदवारी देऊन संपूर्ण मुद्दाच संगमनेरच्या निवडणुकीतून हद्दपार करून टाकला.
याबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, घराणेशाही हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. आज कोणतेही क्षेत्र घेतले जसे की कीर्तन, शिक्षण, उद्योग व्यवसाय, समाजसेवा, खेळजगत या सर्व क्षेत्रांमध्ये पुढची पिढी येत आहे. प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीची क्षमता असेल तो व्यक्ती या सर्व क्षेत्रांमध्ये उतरू शकतो. सत्तेत असणार्‍यांनी विधानसभेसाठी घराणेशाहीचा मुद्दा वापरला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही तो मुद्दा आणायचा प्रयत्न केला मात्र आ. खताळांनी घरातच उमेदवारी दिल्यामुळे कार्यकर्त्यांच्या डोळ्यात एकप्रकारे धूळ फेकली गेली आहे. युतीचे अनेक उमेदवार नाराज आहेत. त्यामुळे आता त्यांना जनताच धडा शिकवेल असे तांबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
खरे यावेळी आघाडीला ही निवडणूक जड जाईल असे बोलले जात होते. आईला थांबवले पत्नीला पुढे केले या आरोपांना तोंड देताना आ. सत्यजित तांबेची दमछाक झाली असती परंतु आ. खताळांनीच त्यांना केवळ सावरलेच नाही तर घराणेशाहीला पाठींबा देत बळ दिले. त्यामुळे मात्र सर्वसामान्य मतदार मात्र महायुतीतून तुटल्याची भावना वाढीस लागली. आज प्रत्यक्ष मैदानात राष्ट्रवादीने वेगळी वाट धरली तर सोबतचा भाजप देखील थबकून पावले टाकत आहे. अनेक वर्षातला प्रचारातला आक्रमकपणा यावेळी मात्र गळून पडलेला दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार महायुतीची डोकेदुखी

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – येणार्‍या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याची तयारी असतानाही स्थानिक शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाने गोंधळ घालून राष्ट्रवादी काँग्रेसला पद्धतशीरपणे डावलले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे संगमनेरमधील शिवसेना आणि भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपाबद्दल बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा द्यायच्या, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या आणि जागा देण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर येथील स्थानिक शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही.

डॉ. विखे पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने शब्द दिला असतानाही स्थानिक शिवसेना आणि भाजपने आम्हाला डावलले असून शिवसेना व भाजपा उमेदवारांचे अर्ज भरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नाही असे थेट आरोप कपिल पवार यांनी केले आहेत. महायुतीच्या बैठकीत ठरलेल्या गोष्टींना येथील शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही, असा पवित्रा घेत, आम्हाला आमच्या पक्षाचे अस्तित्व आहे. त्यामुळे आम्हाला लढायचं आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या जागा ताकदीने स्वबळावर लढवणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरल्याने महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय शिवसेना-भाजप युतीच्या विजयाच्या समीकरणांवर थेट परिणाम करेल.
एकंदरीत, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना आता स्वबळावर उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here