निवडणुकीपेक्षा नातेसंबंधांना प्राधान्य

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग २ मध्ये अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षांसह विविध प्रभागांतील एकूण २० उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून प्रभाग क्र. २ (ब) मधील निवडणूक आता अधिकच रंगतदार झाली आहे. या प्रभागातून संगिता विलास पुंड आणि सुवर्णा दत्तात्रय म्हस्के यांचे अर्ज बाद झाले आहेत. तर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या अर्चना सुभाष दिघे, शिवसेनेच्या इंदिरा शशांक नामन आणि अपक्ष उमेदवार म्हणून रूपाली अभिजित दिड्डी व सुजाता सायन्ना एनगुंदल यांच्या उमेदवारी अर्जांना वैधता मिळाली होती.

मात्र वैध उमेदवारांच्या यादीत बदल घडवणारा महत्त्वाचा निर्णय समोर आला. रूपाली अभिजीत दिड्डी आणि इंदिरा शशांक नामन या नात्याने एकमेकींच्या जाऊबाई असल्याने तसेच शशांक नामन आणि अभिजीत दिड्डी हे एकमेकांचे मावसभाऊ असल्याने या दोन्ही घरांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरुद्ध बाजूंना उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. नातेसंबंध ताणले जाऊ नयेत, घरातील सलोखा अबाधित राहावा आणि समाजात चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी रूपाली अभिजीत दिड्डी यांनी मोठ्या मनाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे समजते.

या निर्णयाने प्रभाग २ मधील निवडणुकीचे वातावरण चांगलेच बदलले आहे. रूपाली दिड्डींच्या माघारीमुळे येथे आता अर्चना सुभाष दिघे आणि इंदिरा शशांक नामन यांच्यामध्येच खरी सरळ लढत होणार असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दोन्ही कुटुंबांकडून जोरदार प्रचाराला प्रारंभ झाला असून समर्थक स्वतःची ताकद दाखवण्यासाठी घराघरात भेटीगाठी करताना दिसत आहेत. रूपाली दिड्डी यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील निवडणूक समीकरणे बदलणार हे निश्चित मानले जात आहे.




















