तांबे यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वाची शहरभर चर्चा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीची एकजूट टिकवता न आल्याने महायुतीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सलग दुसर्यांदा स्थानिक पातळीवर महायुतीला मोठे अपयश झेलावे लागत आहे. चाळीस वर्षांची सत्ता उलथवून टाकत तालुक्यात नवे नेतृत्व निर्माण करणार्या विद्यमान आमदारांसह त्यांच्या महायुतीनेही पुन्हा एकदा संघटनात्मक त्रुटींची पुनरावृत्ती केल्याचे दिसून येते.
थोरात कारखाना निवडणुकीदरम्यान विरोधकांनी मोठा गाजावाजा केला, परंतु विरोधात साधे पॅनलसुद्धा उभे करू शकले नाहीत. हिच परिस्थिती नगरपरिषद निवडणुकीतदेखील प्रकर्षाने जाणवली. महायुती म्हणून ‘पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार’ असा गाजावाजा सुरुवातीपासून होत असला तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत महायुती एकसंध राहू शकली नाही. अंतर्गत कलह आणि परस्परविरोधी भूमिका सातत्याने उघड होत गेल्याने महायुती गटाला मोठे हादरे बसले.

महायुती गोंधळात; राष्ट्रवादी–भाजपमध्ये ऐनवेळी फूट
महायुतीच्या मजबूत पॅनलची अपेक्षा नागरिकांनी धरली असताना अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीमध्ये समेट साधला गेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीपासून नाराज असल्याचे संकेत होते; शेवटी नगराध्यक्ष पदासह अनेक ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे करून राष्ट्रवादीने नाराजी स्पष्ट केली. हीच स्थिती कमी अधिक प्रमाणात भाजपमध्येही दिसून आली. आजही अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया स्टेटसमधून अंतर्गत मतभेद प्रकर्षाने दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशीही महायुतीची एकत्रित यादी जाहीर न झाल्याने त्यांच्या पॅनलमध्ये पूर्णपणे संभ्रमाचे वातावरण आहे.
तांबे यांच्या तुलनेत महायुतीच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट होत आहे. ज्या मतदारसंघातील विजयानंतर महायुतीने मजबूत नगरपरिषद पॅनल उभारण्याचा दावा केला होता, त्या ठिकाणी उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर न करता आल्याने नवीन नेतृत्वाच्या अडचणी अधिक प्रकर्षाने पुढे येत आहेत.
यापूर्वीही जेव्हा कणखर नेतृत्व नसताना नगरपरिषद प्रशासनात विस्कळीत व आराजक परिस्थिती निर्माण झाली होती, तीच पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा मतदारांमध्ये आहे. त्यामुळे शिस्तबद्ध, विकासाभिमुख आणि पुढील पन्नास वर्षे चालणारा कारभार हवा असेल तर संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे लागेल अशा मतांच्या चर्चा शहरभर जोर धरताना दिसत आहेत.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या नाराजीने महायुतीचा पाया कमकुवत झाल्याचे समोर आले आहे. नेतृत्व झुगारुन अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले. एकत्रित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात नवीन नेतृत्व अपयशी ठरले. नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील घरातीलच उभे करावे लागले तर ज्या नेतृत्वस्तंभावर आधार ठेवला, त्यांनीच ऐनवेळी हात काढून घेतल्याची चर्चा शहरभर पसरली आहे. घरातील उमेदवारीमुळे विरोधकांवर उगारलेले घराणेशाहीचे अस्त्र आता आरोप करणार्यांवरच उलटले आहे. परिणामी ‘ज्यांना स्वतःची युती टिकवता येत नाही, त्यांनी शहर विकासाचे दावे करू नयेत’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहराध्यक्ष अमर कतारी यांनी दिली.
नऊ वर्षांनंतर होत असलेल्या नगरपरिषद निवडणुकीमुळे हिवाळ्यात संगमनेरचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. युवा नेते, अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी ऐवजी संगमनेर सेवा समिती यांची 15 वॉर्डसाठी 30 उमेदवारांची शिस्तबद्ध यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.

आघाडीतील सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्यात तांबे यशस्वी ठरले. नगराध्यक्षपदासाठी डॉ. मैथिली तांबे यांचे नाव एकमताने जाहीर करण्यात आल्याने या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीची ताकद अधिक ठळकपणे पुढे आली आहे. यापुर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आघाडीत आणि आणि पक्षीय पातळीवर झालेल्या निवडणुकीतही त्या त्या वेळी सत्ताधार्यांनी सर्वांना सोबत घेऊन राजकारण केले. शहराच्या विकासाचा गाडा पुढे नेला. विरोध गटाचाही सन्मान ठेवला गेल्याने नगरपालिकेत फारश्या विचित्र घटना घडल्या नाहीत. आताही उमेदवार ठरवताना काही ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागली मात्र सत्यजित तांबे यांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अजूनही संगमनेर सेवा समितीचे काही इच्छुक नाराज होऊन त्यांनी बंडखोरी केली आहे. परंतु माघारी पर्यंत ही नाराजी दूर करण्यात येईल असा विश्वास सेवा समिती पदाधिकार्यांना आहे.
दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये सुरवातीपासून अंतर्गत कलह होते. नगराध्यक्षपद, जागा आणि प्रभाग यावर मित्र पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे भाजप च्या उमेदवाराने भाजप बरोबर सेनेच्या वतीने देखील अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीने तर संधी मिळेल तेथे उमेदवार दिले. दाखल करण्यात आलेल्या यादीत भाजपकडून 15, शिवसेनेकडून 16 तर राष्ट्रवादीकडून 14 अर्ज दाखल करण्यात आले आहे. आता माघारी पर्यंत तरी महायुतील दिलजमाई होईल आणि सेवा समितीपुढे सक्षम पर्याय उभा असा आशावाद महायुतीचे कार्यकर्ते करीत आहेत.





















