उमेदवारीत चुरस, नाराजीचे वारे, न्हाऊन निघाले संगमनेर, निवडणुकीत सारे

0
142

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी गेल्या काही वर्षांपासून जोरदार तयारी केल्याने उमेदवारीची प्रचंड संख्या दिसून येते. त्यामुळे आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूंना इच्छुकांना सामावून घेताना मोठी कोंडी निर्माण झाली आहे. दगाफटका होऊ नये आणि प्रतिस्पर्धी पक्षांना त्याचा फायदा मिळू नये म्हणून दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारी जाहीर करण्यात विलंब केला जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही दोन्ही बाजू ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत आहेत.
उमेदवारी न मिळालेल्यांचा बंडाचा इशारा उमेदवारी जाहीर न झाल्याने किंवा मिळण्याची शक्यता कमी झाल्याने अनेक इच्छुकांनी बंडखोरीचा झेंडा उभारला आहे. अनेक ठिकाणी एकाच प्रभागातून अनेक दावेदार असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. अनेक निष्ठावंतांनी आपली निष्ठा ‘गुंडाळून’ ठेवत वेगळा मार्ग अवलंबण्याचा इशारा दिला आहे. ही नाराजी आघाडी आणि महायुती दोन्हींसाठी डोकेदुखी ठरत असून, निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


थोरात-तांबे विरुद्ध खताळ : संगमनेरची वेगळीच लढत गेल्या अनेक दशकांत प्रथमच संगमनेरमध्ये निवडणुकीचे वातावरण वेगळ्या पद्धतीने निर्माण झाले आहे. काँग्रेसचा एकहाती वर्चस्व असलेल्या थोरात-तांबे परिवाराला यावेळी महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महायुतीमध्ये पहिल्यांदाच उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, प्रत्येक प्रभागात इच्छुकांची दाटी झाल्याने पक्षश्रेष्ठींना अंतिम यादी ठरवताना अडचणी येत आहेत.
शहर विकास आघाडीत मोठे बदल : अनेकांची पत्ता कट?
विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीने उमेदवारांच्या निवडीसाठी काटेकोर निकष ठेवले आहेत. प्रत्येक इच्छुकाचा प्रभागनिहाय सर्व्हे, विकासकामांचा आढावा घेत अंतिम उमेदवार निश्‍चित केला जात आहे. त्यामुळे काही ज्येष्ठ आणि निष्ठावंतांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असून, नाराज नेत्यांचे बंड महायुतीला लाभदायक ठरू शकते. महायुतीने अशा नाराजांना काही जागा राखीव ठेवत त्यांना सामावून घेण्यासाठी हालचाली केल्याचे संकेत आहेत.
प्रभागनिहाय आठ-दहा उमेदवारांची शक्यता यावेळी आघाडी, महायुती, वंचित बहुजन, मनसे, इतर पक्ष तसेच अपक्ष असे मिळून एका प्रभागात आठ ते दहा उमेदवारांची चुरस दिसू शकते.
त्यातही महिला उमेदवारांची संख्या यावेळी मोठी असणार आहे. आरक्षणामुळे पुरुषांचे तिकीट कट झाल्याने त्यांच्या पत्नी किंवा कुटुंबातील महिलांना पुढे करून पालिकेत प्रवेश मिळवण्याची तयारी अनेकांनी केली आहे. अनेक इच्छुक तर दोन्ही आघाड्यांशी जवळीक ठेवत, एका आघाडीत तिकीट न मिळाल्यास दुसरीकडे जाण्याचा खुला पर्याय ठेवून आहेत.


जातीय समीकरणांचा प्रभाव : प्रभागात अतिक्रमण, वाढती नाराजी जातीय समीकरणांनुसार अनेक इच्छुकांनी स्वतःचा प्रभाव दुसर्‍या प्रभागात वळवला आहे. त्यामुळे मूळ प्रभागातील इच्छुकांमध्ये अतिक्रमणाच्या आरोपांमुळे प्रचंड नाराजी आहे. अनेक वर्षे पक्षाशी निष्ठा ठेवूनही संधी न मिळाल्याने काही जण विरोधी गटात जाण्यास तयारीत आहेत. नाराजी आणि संभाव्य बंड रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींची चांगलीच धावपळ चालू आहे.
आघाडी आणि महायुतीतील असंतोष वाढला. जागा कमी आणि इच्छुक जास्त असल्याने दोन्ही आघाड्यांमध्ये तणाव वाढत आहे. मित्रपक्षांना जास्त जागा देणे पक्षांतर्गत नाराजी वाढवू शकते, तर कमी जागा दिल्यास मित्रपक्ष बंडखोरीचा मार्ग अवलंबू शकतात. आघाडीत शिवसेना (ठाकरे गट) नाराज असून स्वतंत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीत राष्ट्रवादी (अजितदादा गट) नाराज असून तिकीट न मिळाल्यास स्वतंत्र उमेदवारीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मनसेला दोन्ही आघाड्यांत स्थान न मिळाल्याने ते अपक्ष किंवा स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहेत. संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची, गुंतागुंतीची आणि बहुआयामी स्वरूपाची दिसत आहे. इच्छुकांची प्रचंड संख्या, पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरीचे वारे, जातीय समीकरणे, आघाडी-युतीतील मतभेद यामुळे या निवडणुकीत अनेक अनपेक्षित घडामोडी घडू शकतात. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल होताना अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता असून, अंतिम उमेदवारी यादीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट करणार आहे.

प्रभाग 1 – माजी नगराध्यक्ष दिलीपराव सहदेव पुंड, अभिजीत उर्फ मुन्ना अरुण पुंड, अश्‍विनी सतीश ढोले, मनीषा शेखर नेवासकर, संगीता विकास पुंड, संकेत लोंढे.
प्रभाग 2 – भारत बोर्‍हाडे, लाला बोर्‍हाडे, सौ. अंबादास आडेप, आकाश गोडगे, स्वप्नील आव्हाड, सुभाष दिघे, सौ. अभिजीत दिड्डी, सुरेश गायकवाड, विकास जाधव, रवींद्र उडता, धनंजय राजेंद्र आव्हाड.
प्रभाग 3 – सुनंदाताई दिघे, सौरभ कासार, एम. वाय. दिघे, शशांक नामन, नितेश शहाणे, मिलिंद अभंग, सागर पगारे, निरंजन सातपुते, वैभव दिवेकर, श्रीकांत मुर्तडक, बाळासाहेब पवार, मुन्ना कडलग, सुशील शेवाळे, जीवन लांडगे, राजेंद्र वाकचौरे.
प्रभाग 4- सिद्राम दीड्डी, सोमेश्‍वर दिवटे, सतीश आहेर, बादल जेधे, जयदेव यादव, अण्णासाहेब सानप, मुकेश मिलानी, जयकिशन मुकेश मिलानी, सौ. प्रकाश कडलग, किशोर पवार.
प्रभाग 5 – विश्‍वास मुर्तडक, रवी मस्के, संजय मंडलिक, भारत गवळी, कन्हैया मंडलिक, मनोज गुळवे, शारदा कर्पे, कांचनताई ढोरे.
प्रभाग 6- राहुल भोईर, पिंटू गाडे, गजेंद्र अभंग, संतोष भुजबळ.
प्रभाग 7 – आशिष कोठवळ, रेखा गलांडे, संगीता भरीतकर, अमित मंडलिक, नितीन अभंग, अनुराग ताजणे. पुजा त्रिलोक कतारी.
प्रभाग 8 – गणेश गुंजाळ, पायल ताजने, मेघा भगत, किशोर पवार.
प्रभाग 9 – अमित गुंजाळ, अ‍ॅड. शरीफ पठाण, अमजद पठाण, लता पवार, शिरीष सहाणे, आयशा कदीर देशमुख, समीर रज्जाक शेख, सचिन शहाणे, रोहिणी सातपुते, सचिन भागवत, बाळासाहेब माताडे, ज्योती घुगे, विलास गुंजाळ, अर्चना नवले, अतिक इनामदार, अभिजीत घाडगे, शिरीश सहाणे, शादाब शेख.


प्रभाग 10 – हुरबानो गुलामसाबीर कुरेशी, फैरोजा इम्तियाज शेख, नाजमिन मिर्झा पठाण, शादाब मुस्ताक शेख, नुरमोहमद हजी, साबीर पनाडी, रईज व्यापारी, नाजमीन मिर्झा पठाण.
प्रभाग 11- जावेद जागीरदार, सय्यद मुदस्सरअली मुस्ताक अली उर्फ गोपी जागीरदार, अन्सार सय्यद, परविन अमजद सय्यद, सौ. श्याम भडांगे, रिजवान अब्दुलभाई शेख, शोएब मुजीब शेख, अंजुम इरफान शेख,
प्रभाग 12 – कैलास वाकचौरे, कपिल टाक, किशोर टोकसे, बाबु अमृतवाड, सौ. अंजली समीर ओझा, सौ. स्वप्निल बाहेती, ज्ञानेश्‍वर कर्पे.
प्रभाग 13 – शैलेश कलंत्री, सागर भोईर, धीरजसिंग ठाकूर, तुषार घोडेकर, दिनेश दफेदार, श्रीमती जेधे, सौ. पप्पू तेजी, अमोल डुकरे, अंबादास आडेप, साक्षी विनोद सुर्यवंशी.
प्रभाग 14 – डॉ. दानिश पठाण, योगेश जाजू, प्रसाद पवार, किरण पाटणकर, अमित पवार, वरद बागुल, सौ. मुकुंद गरुडकर
प्रभाग 15 – मुजीब खान अब्दुलखान पठाण, शेहबाज अली, रिजवान मंत्री, इसाक शेख, मुजीब खान अब्दुलखान पठाण.
यासह अनेक नावे इच्छुक म्हणून पुढे येत आहे. नगराध्यक्ष पदासाठी आघाडी आणि महायुतीबरोबरच वंचित, शिवसेना (उबाठा), एमआयएम त्याचबरोबर अपक्ष असे अनेक महिला उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवार 17 नोव्हेंबर असून मधे रविवार असल्याने केवळ दोन दिवस बाकी आहे. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची घोषणा शनिवारी होण्याची शक्यता असून सोमवारी ते अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी शुक्रवार, शनिवार या दिवशी इच्छुक अपक्षांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. गुरूवार पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. इंटरनेट समस्येमुळे देखील अडचणी येत असून प्रशासनाने आता ऑफलाईन अर्ज स्विकारण्यास मंजूरी दिली आहे. नविन नगर रोड येथील प्रशासकीय भवानात अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून या ठिकाणी आता गर्दी होतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here