संगमनेर 2.0 जाहिरनाम्यातील कल्पना व सुचना ऐकण्यासाठी आ. तांबे साधणार नागरिकांशी थेट संवाद

0
13

संवाद सत्र 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी मालपाणी लॉन्स येथे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आगामी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संगमनेर शहराच्या भविष्याचा आराखडा नागरिकांच्या सहभागातून तयार व्हावा, या उद्देशाने आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘संगमनेर 2.0’ हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत ते शहरातील नागरिक, संस्था, मंडळे आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत. हे संवाद सत्र शुक्रवार (14 नोव्हेंबर) आणि शनिवार (15 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी 7 वाजता मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.
तांबे म्हणाले, संगमनेरच्या विकासात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. हा जाहीरनामा म्हणजे केवळ राजकीय दस्तऐवज नाही, तर संगमनेरकरांच्या स्वप्नांचा आणि अपेक्षांचा आरसा असेल. शहराच्या भविष्यातील वाटचालीत प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा आहे. संगमनेर 2.0 या उपक्रमात आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नागरिकांनी सहभाग नोंदविलेला आहे. डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, विद्यार्थी, महिला यांनी क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. विविध संस्था संघटनांनी सुद्धा प्रत्यक्ष भेटून या जाहीरनाम्यात काय समाविष्ट असावे याबाबतीतील आपल्या भूमिका आ. सत्यजीत तांबे यांच्याकडे सादर केलेल्या आहेत.
तांबे पुढे म्हणाले, सामान्यपणे निवडणुकीत जाहीरनामा काही मोजक्या लोकांच्या बैठकीत तयार होतो. पण या वेळी आम्ही ठरवले आहे की संगमनेरकरांनी स्वतः आपल्या शहराचा जाहीरनामा तयार करावा. येत्या दोन दिवसांच्या संवाद सत्रात मी स्वतः उपस्थित राहून प्रत्येकाची मते ऐकणार आहे. त्या प्रत्येक मताचे प्रतिबिंब ‘संगमनेर 2.0’ मध्ये दिसेल. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरने गेल्या काही दशकांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. आता या प्रगतीला नवे रूप देत, पुढील 50 वर्षांसाठी आधुनिक, हिरवेगार, पर्यटनकेंद्रित आणि डिजिटल संगमनेर उभारण्याचे स्वप्न सत्यजित तांबे पाहत आहेत.


हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून, विशेषतः युवक, महिला, व्यावसायिक, शेतकरी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांना आपले विचार मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. नागरिकांना संध्याकाळी 7.30 वाजता होणार्‍या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक आणि विविध संस्था आणि मंडळांनी सत्यजित तांबे यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत पाच हजार सूचना-
‘संगमनेरकरांचा जाहीरनामा’ या अभियानांतर्गत गुगल फॉर्म, सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, ईमेल आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे आतापर्यंत 5 हजारांहून अधिक सूचना आणि कल्पना प्राप्त झाल्या आहेत. या सूचनांमध्ये शहर नियोजन आणि विकास, स्थानिक उद्योगवृद्धी, युवकांना रोजगार, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांचा समावेश आहे.

आपली कल्पना, आपले शहर
‘संगमनेर 2.0’ अंतर्गत नागरिकांकडून मिळालेल्या काही सूचना आधीच चर्चेत आहेत – शहरात सायकल ट्रॅक, स्वच्छतेसाठी स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान, स्थानिक पर्यटन प्रोत्साहन योजना आणि नवीन स्टार्टअप पार्क अशा काही प्रस्तावांना विशेष प्रतिसाद मिळत आहे.
आता सूचना पाठवा व्हाट्सअप वर
शहराच्या विकासात योगदान देऊ इच्छिणार्‍या प्रत्येक संगमनेरकराने या उपक्रमात सहभागी व्हावे. गुगल फॉर्म च्या जोडीने आता नागरिकांसाठी एक व्हाट्सअप नंबरही सुरू करण्यात आलेला आहे, 9112 773 773 या क्रमांकावर आपल्या सूचना पाठवाव्या आणि उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. संगमनेरचा विकास हा फक्त आमदार किंवा नगरसेवकांचा विषय नाही, तो प्रत्येक संगमनेरकराचा विषय आहे. आपण सर्व मिळून संगमनेर 2.0 घडवूया. – आमदार सत्यजीत तांबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here