नाराजांची समजूत काढतांना नेत्यांची दमछाक, दगाफटका होऊ नये म्हणून वेट अँड वॉच

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरु आहे. मात्र अद्यापही महायुती आणि शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदाच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विलंबामागे प्रभागातील वाढलेल्या गमती-जमती आणि काटशहाच्या राजकारणाचे सत्र कारणीभूत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
शहरात पंधरा प्रभागात 30 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्याचबरोबर ही निवडणूक चार वर्षे उशिरा होत असल्याने प्रत्येक प्रभागात इच्छुकांची रांग लागली असून काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती उमेदवारीसाठी पुढे येत आहेत, तर काही ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांवर नव्या चेहर्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दिग्गज नेत्यांच्या गणितात मोठा गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. एकेकाळी आपल्या प्रभावामुळे ‘निश्चित उमेदवार’ मानले जाणारे अनेक जण आता आपली उमेदवारी निश्चित होईल का? या संभ्रमात आहेत.
एकही अर्ज दाखल नाही, सोशल मिडियावर मात्र लाईक आणि शेअर
संगमनेरमध्ये ‘भावी नगरसेवक’ अजून ऑनलाईनपुरतेच मर्यादित आहेत. गेल्या काही वर्षांपासून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत उतरू इच्छिणारे भावी नगरसेवक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट, व्हिडिओ आणि शुभेच्छा बॅनरचा अक्षरशः पूर आला असला तरी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बाबतीत मात्र अजूनही शांतता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला फक्त पाचच दिवस शिल्लक असताना, संगमनेरसह जिल्ह्यातील एकाही नगरपालिका किंवा नगरपंचायतीत आज अखेर नगराध्यक्ष अथवा सदस्य पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ‘मीच तुमचा पुढचा नगरसेवक’, ‘जनतेचा सेवक’ अशा घोषणांनी गल्लोगल्लीत गजर असला तरी प्रत्यक्ष अर्ज दाखल न झाल्याने हे सर्व भावी नगरसेवक सध्या तरी ऑनलाईनपुरतेच सीमित राहिले आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवारी वाटपाचे मोठे गणित आणि पेच निर्माण झाला आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची रांग वाढत असून, बंडोबांचा सूरही हळूहळू उमटू लागला आहे. अनेकांनी पक्षांतराची किंवा बंडखोरीची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरताना थकित करांचा भरणा, कागदपत्रांची पूर्तता यांचा मोठा अडथळा येत असल्याचे समजते. काही जण तर या प्रक्रियेतच मेटाकुटीला आले आहेत. त्याचबरोबर इंटरनेट सेवा सुरळीत चालत नसल्याने ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ऑफलाईन अर्ज दाखल करून घ्यावे अशी मागणी इच्छुक उमेदवार करीत आहेत. दरम्यान गल्लो गल्ली पाहिली तर, रस्त्यावरून जाता-जाता कुणी ‘मेंबर’ म्हणून आवाज दिला तरी दोन-चार संभाव्य उमेदवार तत्काळ समोर येतात इतकी स्पर्धा वाढली आहे. मात्र अंतिम अर्ज दाखल होईपर्यंत सोशल मीडियावरील ‘लाईक’ आणि ‘शेअर’वरच प्रचार मर्यादित राहणार का, हा प्रश्न मात्र सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.

दरम्यान, काही प्रभागांमध्ये आघाडीच्या गटातच मतभेद उफाळले असून तिकिट वाटपावरून नाराजीचे सूर उमटत आहेत. तर दुसरीकडे, महायुतीत देखील प्रभागांतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे. काही वरिष्ठ नेत्यांनी आपल्या निष्ठावंतांना तिकीट मिळावे म्हणून दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी आणि शिफारसींचा पाऊस पडत आहे.
प्रभागनिहाय राजकीय समीकरणांमध्ये काही ठिकाणी अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. कुणाचा कटाक्ष कोणावर, कोण कुणाला समर्थन देतो आणि कुणाचे पाय ओढतो हे सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणाची रंगत वाढली असून, प्रत्येक प्रभागात काटशहाचे राजकारण उफाळून आले आहे.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरही याच गमती-जमतींचा थेट परिणाम होत आहे. दोन्ही आघाड्यांतील काही संभाव्य उमेदवार आतल्या गोटात लॉबिंग करताना दिसत आहेत. काही ठिकाणी अपक्ष म्हणून लढण्याचे इशारे दिले जात आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे निर्णय घेणे म्हणजे डोकेदुखीचे काम झाले आहे.
राजकीय पातळीवर चाललेली ही रस्सीखेच निवडणुकीत रंगत आणणारी ठरली असली, तरी मतदार मात्र कोण उमेदवार होणार आणि कोण मागे पडणार? याकडे उत्सुकतेने पाहत आहेत. आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपणार असून त्याआधी दोन्ही आघाड्यांची अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र संगमनेरमध्ये गमती-जमतींचे राजकारण चांगलेच रंगणार आहे.
शहरातील प्रभाग एक मध्ये यावेळी मोठ्या घडामोडी घडतांना दिसत आहे. माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड यांचा या प्रभागावर होल्ड होता. मात्र या प्रभागातील युवा कार्यकर्ते मुन्ना पुंड यांनी महायुतीची वाट धरुन मोठे आव्हान उभे केले आहे. याच प्रभागातून अश्विनी सतिष ढोले, मनिषा शेखर नेवासकर, सौ. संगिता विकास पुंड, यांच्यासह अनेक इच्छुक एकमेकांना आव्हान देत पक्षश्रेष्ठीचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रभाग दोन मध्ये शहर विकास आघाडीकडूनच अनेक जण इच्छुक आहेत. त्याचबरोबर महायुतीकडून देखील अनेक इच्छुकांनी कंबर कसली आहे. या इच्छुकांमध्ये भारत बोर्हाडे, लाला बोर्हाडे, सौ. अंबादास आडेप, आकाश गोडगे, स्वप्नील आव्हाड, सौ. अभिजित दिड्डी, सुरेश गायकवाड यांचा समावेश आहे. प्रभाग तीन मध्ये तर अनेक इच्छुक रांगेत उभे आहेत. यातील काही जण मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी घेण्यासाठी तयार आहेत तर काही जण उमेदवारी न मिळाल्यास बंडाच्या पवित्र्यात आहेत. या ठिकाणी सौरभ कासार, मिलिंद अभंग, सुनंदा दिघे, शशांक नामन, नितेश शहाणे, सागर पगारे, निरंजन सातपुते, वैभव दिवेकर, श्रीकांत मुर्तडक, बाळासाहेब पवार, प्रमोद उर्फ मुन्ना कडलग, सुशील शेवाळे, जीवन लांडगे, सौ. अभंग, सौ. कासार, सौ. कान्होरे, सौ. पवार मॅडम यांच्यासह इच्छुकांची मोठी रांग लागली आहे.
प्रभाग चार मध्ये तर आघाडीत मोठी स्पर्धा निर्माण झाली असून काँग्रेस शहर अध्यक्ष सोमेश्वर दिवटे, सतीश आहेर आणि आता किशोर पवार असे दिग्गज उमेदवार उमेदवारी मागत आहे. तर दुसरीकडे याच प्रभागात माजी नगरसेवक सिद्राम दिड्डी, प्रविण कानवडे, बादल जेधे, गणेश गुंजाळ, आण्णासाहेब सानप हे प्रयत्नशील असून या प्रभागात बंडखोरीची मोठी शक्यता वर्तविली जात आहे.
पभाग पाच हा माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचा प्रभाग असून या प्रभागात प्रथमच मोठ्या प्रमाणावर चुरस वाढली आहे. येथून आघाडी व युतीकडून नेमके कोण उमेदवार असणार यावर मोठी खल होत आहे. मुर्तडत यांच्या बरोबरच रवी म्हस्के, संजय मंडलीक, बाळू बनकर, संजय मंडलीक, भारत गवळी, शिवाजी अभंग, कन्हैय्या मंडलीक, मनोज गुळवे, शारदा कर्पे, कांचन ढोरे असे अनेकजण इच्छुक आहे. शहरातील इंदिरानगरचा भाग असणार्या प्रभाग 6 मध्ये देखील आता उमेदवारीसाठी रंगत वाढली आहे. गजेंद्र अभंग, राहुल भोईर, पिंटु गाडे, संतोष भुजबळ यांच्यसह पप्पु गोडगे यांच्यासह अनेक इच्छुक आहेत. असंख्य इच्छुकांबरोबर ज्येष्ठ नेत्यांचा भरणा असणार्या या प्रभागात नागरिकांची नाराजी देखील मोठ्या प्रमाणावार आहे. मात्र उमेदवारीसाठी या इच्छुकांकडून गमतीजमती केल्या जात असल्याने श्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.





















