लाखो रुपयांचा माल जप्त

संगमनेरात नेमकं चाललयं काय? तरूण पिढीला जपण्याचे मोठे आव्हान !
मागील काही दिवसांपासून शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तत्कालीन शहर पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचा वचक नाहीसा झाला होता. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी जोर धरत होती. त्यांच्या जागी समीर बारवकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या अवैध धंद्यावर आणि येथील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दारू, मटका, जुगार, हुक्का पार्लर या व्यसनामुळे तरुण पिढीसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. अवैध व्यसनी धंद्याचा हा खेळ उध्वस्त करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
संगमनेर (प्रतिनिधी) –
संगमनेर शहर पोलिसांनी विक्रीस बंदी असलेल्या गुटखा, तंबाखू तसेच हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य यांच्या अवैध विक्रीवर मोठी कारवाई करत शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा बस स्टँड परिसरात छापा टाकून सुमारे ₹२,२८,८०७/-* किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त केला तसेच हुक्क्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत सावंत, पोलिस कॉ. बाबासाहेब सातपुते, महिला पोलिस हेड कॉ. संगीता डुंबरे, सुजाता थोरात, पो.कॉ. रामकिसन मुकरे, पोकॉ. विजय खुळे, पोकॉ. अतुल उंडे, पोकॉ. विजय आगलावे, पोकॉ. सागर नागरे, पोकॉ. राहुल पांडे या पथकाने केली. पोलिस उपनिरीक्षकांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लक्ष्मी पान स्टॉल, बस स्टँड, संगमनेर येथे छापा टाकला असता, तेथे मोठ्या प्रमाणात विक्रीस बंदी असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू, हुक्का फ्लेव्हर्स तसेच विक्रीसाठी तयार केलेल्या पिशव्या आणि साहित्य असा मोठा साठा आढळून आला. पंचनाम्यात विविध नामांकित कंपन्यांचा गुटखा, सुगंधी पान मसाला तसेच हुक्का वापरण्यासाठी लागणारी उपकरणे, पॅकिंग साहित्य, फ्लेव्हर पावडर आदी साहित्य सापडले. या सर्व वस्तूंची एकूण किंमत दोन लाखांच्या वर आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार ही विक्री कायद्याने बंद असून, अशा प्रकारचे पदार्थ सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. तरीही आरोपी प्रवीण बत्तुल हा आपल्या दुकानातून गुप्तपणे या वस्तूंची विक्री करत होता, असे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आपल्या दुकानात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवून ठेवत होता आणि शहरातील विविध भागांत पुरवठा करीत होता. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125(अ), 125(ब), 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2)(अ), 27(3)(इ) आणि 59 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंसह आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरात बंदी असलेल्या गुटखा आणि तंबाखूच्या विक्रीबाबत काही दिवसांपासून तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार गुप्तपणे माहिती गोळा करून पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. बस स्टँड परिसरातच छापा पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना असेही आढळले की, आरोपीने विक्रीसाठी ठेवलेला माल विविध ब्रँडचा असून त्यामध्ये भारतीय चलनाच्या स्वरूपात ₹१,९८,३९० किंमतीच्या नोटाही सापडल्या. याशिवाय पान मसाला, गुटखा, सुगंधी तंबाखू, हुक्का फ्लेव्हर, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, आणि मोबाईल असा एकूण ₹२,२८,८०७ किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे संगमनेर शहरात अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की अशा प्रकारच्या अवैध व्यवसायावर आता कोणतीही दया दाखवली जाणार नाही.

सदर आरोपी जनता नगर येथे पानटपरी व्यवसाय चालवत असून आर्थिक फायद्याकरिता शिवाजीनगर येथील राहत्या घरी देखील अवैध गुटखा तयार करीत होता. पोसई सावंत यांनी सविस्तर पंचनामा करून सदर मुद्देमालापैकी रासायनिक विश्लेषनाकरिता मुद्देमाल बाजूला काढून पंचासमक्ष सीलबंद करून पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलिस ठाण्यात जमा केला. या छाप्यामुळे गुटखा, तंबाखू आणि अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. संगमनेर परिसरातील आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांची ही धडक कारवाई अत्यंत आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.





















