सकारात्मक आणि विकासाच्या कामावर भर – आ. तांबे



ACTION ला REACTION द्यायची नाही, कार्यकर्त्यांनाही नो ट्रोलिंगचे आवाहन
मागील काही दिवसांपासून Action ला Reaction दिली गेली. विविध प्रकारचे ट्रोल रील्स दोन्ही बाजूने करण्यात आले. मी व्यक्तीश: त्याच्यामध्ये नाही. माझे विचार तसे नाहीत. मला अजिबात त्यामध्ये इंटरेस्ट नाही. माझे कोणी कार्यकर्ते, समर्थक मित्र परिवार असे रील्स करत असतील तर मी स्पष्टपणे सांगतो की अजिबात ट्रोलिंग रील्स करायचे नाही. आपण आपलं काम करत रहायचं. सकारात्मक काम करत रहायचं. तर कामगिरीतून उत्तर द्यावं या मताचा मी आहे.
म्हणूनच आपण आपलं काम करत राहायचं. कोण काय बोलतंय, कोण ट्रोल करतंय याकडे दुर्लक्ष करून, आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने सातत्याने कष्ट करत राहायचे या मताचा मी आहे. माझे आणि माझ्या कुटुंबाचे काही तत्त्व आहेत, ते आम्ही नेहमी पाळतो.
- आमदार सत्यजीत तांबे
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेची निवडणुक जाहिर झाल्यानंतर शहरामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोमवार 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 15 प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असून प्रत्येकजण आपआपल्या परीने सोशल मीडियावर ‘भावी नगरसेवक’ म्हणून आपली पोष्टरबाजी करत आहे. विनाचिन्ह केलेली भपकेबाजी ही तात्पुरती असून आ. अमोल खताळ यांची महायुती आणि आ. सत्यजित तांबे यांची आघाडी ताकही फुंकून पीत आहे. इच्छुकांची संख्या प्रचंड असली तरी प्रभागातील काम, जनसंपर्क, समाजातील प्रतिमा यांच्या जोरावरच यंदाची उमेदवारी जाहिर होणार असून उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजूंकडून काटेकोर निकष लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून संगमनेरमध्ये ‘ट्रोलिंग रील्स’ची नवीन संस्कृती उदयास आलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार अमोल खताळ आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांकडून ट्रोलिंग रील्स बनविण्यात आले. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅप हे अतिशय महत्वाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून तरूणाईच्या मनात नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सर्रास वापर सुरू झालेला आहे. एखाद्या गाण्यावर नाचणार्या माणसाचा चेहरा बदलून त्या ठिकाणी विद्यमान किंवा माजी आमदारांचा फोटो लावून ट्रोलिंग करणे हा किळसवाना प्रकार दोन्ही बाजूने सुरू होता.
या विकृतीमुळे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे विकासाच्या मुद्यावर एकमेकांशी लढायचे. सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर, मतदारसंघात किंवा महाराष्ट्रात गेल्यावर एकमेकांवर कवीतेच्या माध्यमातून कोटी करून चिमटा काढायचे. आता मात्र संपूर्ण महाराष्ट्राचे घाणेरडे राजकारण या ट्रोलिंगच्या माध्यमातून जनतेसमोर येत आहे.
ख र्ङेींश छरसरी आयोजित ‘अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ 2025’ या कार्यक्रमात आ. सत्यजीत तांबे बोलत होते. ‘गाव ते ग्लोबल’ या विषयावर त्यांनी आपली मते मांडली. सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव आजच्या सर्व वयोगटांतील लोकांवर प्रचंड प्रमाणात आहे. अगदी गाव-खेड्यांपासून ते जागतिक पातळीपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजते. जर या सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने केला, तर कोणतीही संधी ‘सोनं’ बनू शकते; आणि त्याचं गैरवापर केल्यास मोठी हानीही होऊ शकते.
माझ्या राजकीय प्रवासातही सोशल मीडियाचा मोठा उपयोग झाला आहे. लोकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी, त्यांच्या भावना आणि गरजा समजून घेण्यासाठी सोशल मीडियाने एक सोपा आणि प्रभावी दुवा तयार केला. संवाद आणि सहभागाच्या या डिजिटल माध्यमामुळे जनतेशी जोडणं अधिक सुलभ आणि परिणामकारक झाले आहे असे मत आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले.
फ्लेक्स काढण्यासंदर्भात माझी जी भूमिका होती तीच भमिका माझी ट्रोलिंगच्या विरोधात आहे. मागे अॅक्शनला रिअॅक्शन म्हणून काही रील्स बनवल्या गेल्या असल्या तरी मी मात्र अशा प्रकारच्या ट्रोलिंगच्या विरोधातला आहे. मी व्यक्तीश: अशा विचाराचा माणूस नाही असेही आ. सत्यजीत तांबे यांनी एका पॉडकास्ट मध्ये सांगितले. जनतेने आम्हाला प्रचंड प्रेम दिलेले आहे. त्यामुळे लोकांमध्ये राहून त्यांचे सतत प्रश्न सोडवत राहणे हेच माझे धोरण आहे. हेच धोरण आम्ही राबविणार असून कार्यकर्त्यांनाही तशा सूचना दिल्याचे आ. तांबेंनी सांगितले.





















