आघाडीचे सारथ्य आ. सत्यजित तर युतीचा प्लॅन आ. खताळांकडे

0
13

प्रतिष्ठेची लढत – तांबे विरुद्ध खताळ
एकूणच, संगमनेरची ही नगरपरिषद निवडणूक दोन्ही आघाड्यांच्या प्रतिष्ठेची लढत बनली आहे. आघाडीचे शिलेदार आ. सत्यजित तांबे आणि महायुतीचे सेनापती आ. अमोल खताळ या दोन्ही युवा नेत्यांच्या नेतृत्वाची, संघटनशक्तीची आणि धोरणात्मक चातुर्याची खरी कस या निवडणुकीत लागणार आहे.
शहरात हळूहळू थंडी वाढत असली तरी राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे. सोशल मीडियावर अफवा, सर्व्हे आणि प्रचार मोहीम जोर धरत आहेत. उमेदवार निश्चित होईपर्यंत दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता, तणाव आणि कुजबुज सुरूच आहे. आगामी काही दिवसांत अर्ज प्रक्रिया सुरू होताच संगमनेरचे राजकारण आणखी गतीमान होईल, यात शंका नाही. शहरातील विकासाचा आराखडा, नव्या चेहर्‍यांची निवड आणि स्थानिक गटबाजीचे समीकरण हेच या निवडणुकीचे निर्णायक ठरणार आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आगामी संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, 10 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरणात प्रचंड चढाओढ सुरू झाली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी शहर विकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पातळ्यांवर इच्छुकांची अक्षरशः रांग लागली आहे.
नेत्यांच्या दारात सतत शिष्टमंडळांची वर्दळ सुरु आहे. इच्छुक आपले कार्य, जनसंपर्क आणि समाजातील प्रतिमा यांची माहिती सविस्तर देत आपणच योग्य उमेदवार असल्याचे पटवून देण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र यावेळी दोन्ही पक्षांनी उमेदवार निवड प्रक्रियेत काटेकोर निकष लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांची उमेदवारी ‘अजून थांबलेली’ असून, त्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे.
संगमनेर नगरपरिषदेसाठी काँग्रेस प्रणित संभाव्य शहर विकास आघाडीची जुळवाजुळव सुरू असून, या आघाडीचे नेतृत्व विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हाती आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी मैदानात उतरणार असली तरी यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. स्थानिक स्तरावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा गट) यांच्यातील समन्वयाचे आव्हान तांबे यांच्या समोर आहे.
यावेळी पक्षांतर्गत गटबाजी व नाराजी कमी करण्यासाठी, सोशल मीडियावरील बोगस सर्व्हे किंवा स्वघोषित लोकप्रियतेवर विश्वास न ठेवता, प्रत्यक्ष मतदारसंघ पातळीवर स्वतंत्र सर्वेक्षण यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून मतदारांचा कल आणि उमेदवारांची जनमानसातील प्रतिमा जाणून घेतली जात आहे.
तसेच, यावेळी माजी नगरसेवकांच्या कामगिरीचा सखोल आढावा घेऊनच त्यांना पुनश्च संधी देण्याचा काँग्रेस नेत्यांचा विचार आहे. त्यामुळे अनेक माजी नगरसेवक सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत आहेत. दरम्यान, आघाडीतील शिवसेना (उबाठा गट) ने काही दिवसांपूर्वी स्वतंत्र लढण्याचा इशारा देत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर केला असला तरी, अजूनही काँग्रेस नेत्यांकडून संवाद सुरू असून, अंतिम क्षणी आघाडी एकत्र राहील असा विश्वास नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दुसरीकडे, महायुतीत देखील सर्व काही सुरळीत नाही. काही इच्छुकांच्या नावावरून नाराजी व्यक्त होत असली तरी आमदार अमोल खताळ यांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने हाताळण्याचा निर्धार केला आहे. खताळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट), आणि इतर सहयोगी पक्षांमध्ये बैठकांची मालिका सुरू आहे. आ. खताळ यांच्या कार्यालयात उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असून, काही तर ठाण मांडून बसले आहेत. मात्र आ. अमोल खताळ आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी अशा उतावीळ इच्छुकांना संयम आणि सबुरीचा सल्ला दिला आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांचा सन्मान राखत लढविली जाईल, पण जिंकण्यासाठी योग्य व्यक्तींचीच निवड होणार, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे.
महायुतीकडून यावेळी संगमनेरमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यावर भक्कम मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. विशेषतः नव्या मतदारांना आणि युवकांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र प्रचार आराखडा तयार करण्याचे संकेत मिळत आहेत.
नऊ वर्षानंतर निवडणूक होत असल्याने यावेळी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात तरूणांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. सोशल मीडियाच्या या जमान्यात अनेक युवाकार्यकर्ते विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरीकांना आकर्षित करत आवाहन करत आहे. परंतू यातील अनेकजण विना नेता, विना झेंडा, विना चिन्ह, भपका प्रचार करत असल्याने मतदारांमध्ये देखील मोठा संभ्रम वाढला आहे. नगरपरिषदेत 50 टक्के महिला राखीव असल्याने आघाडी व महायुतीला सक्षम महिला उमेदवारांचा शोध घेतांना नाकी नऊ येत आहे. आपल्या सौभाग्यवतींसाठी अनेकजण नेत्यांजवळ फिडींग लावून आहेत. प्रत्येक प्रभागात एकापेक्षा अधिकजण इच्छुक असून या इच्छुकांची समजूत काढणे हे मोठे काम नेत्यांना लागले आहे.
आमदार सत्यजीत तांबे हे एक अभ्यासू युवा नेते म्हणून ओळखले जातात. यावेळी पहिल्यांदाच त्यांनी ही निवडणूक हाती घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत. तरूण, अनुभवी, ज्येष्ठ यांचा मेळ घालून चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न ते करणार आहे. त्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here