सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले -अकोले विधानसभा मतदारसंघातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या श्रीमती सुनिता अशोकराव भांगरे आणि शेंडी ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीपराव भांगरे यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत पक्षप्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र या पक्षप्रवेश सोहळ्यामागे माजी आमदार वैभव पिचड यांची रणनिती असल्याचे बोलले जात आहे. सुनिता भांगरे यांचे पुत्र अमित भांगरे हे वैभव पिचड यांचे प्रतिस्पर्धी होते. मात्र आता सुनीता भांगरे यांना भाजप प्रवेश देऊन पिचड यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहे. पुढील राजकीय वाटचाल मजबूत करण्यासाठी पिचड आणि भांगरे एकत्र येऊन विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना शह देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हा पक्ष प्रवेश सोहळा महत्वाचा ठरला.

दुसरीकडे या प्रवेशामुळे अकोले तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत होणार असून, स्थानिक पातळीवरील विकासकामांना नवे बळ मिळेल, असा विश्वास यावेळी वरीष्ठ नेत्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते सिताराम भांगरे, तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या पदासाठी भाजपकडून शोध सुरू होता. काही दिवसापूर्वी भांगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी मुंबईत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भांगरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचा हा शोध आता संपला आहे. आता त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अकोल्यात येऊन अमित भांगरे आणि सुनीता भांगरे यांना ताकद आणि संधी देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी प्रयत्न केले. मात्र भांगरे यांना त्यात यश आले नव्हते. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भांगरे यांनी पवारांची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. दरम्यान सुनिताताई भांगरे यांनी प्रवेश केला असला तरी त्यांचे पुत्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी मात्र हा आईचा स्वतंत्र निर्णय असल्याचे सांगत राजकीय बॉम्ब टाकला आहे.






















