महाआघाडी नाही तर ‘शहर विकास आघाडी’चा प्रयोग ?

0
141

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- दिवाळी उत्सवानंतर संगमनेरच्या राजकारणात पुन्हा चुरस वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वच पक्षांकडून बैठका, दौरे आणि रणनीती आखणीला वेग आला आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पातळ्यांवर जागावाटप व उमेदवार निवडीवर अद्याप अंतिम एकमत झाल्याचे चित्र नाही.
नुकत्याच झालेल्या बैठकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना धक्का दिला आहे. विधानसभेला मदत घेतली आणि आता स्वबळ आठवतेय, अशी नाराजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान काँग्रेसमध्ये नगरपरिषद निवडणूक पक्षचिन्हावर न लढता, सर्व विरोधकांना एकत्र आणून ‘शहर विकास आघाडी’च्या नावाने लढण्याचा प्रस्ताव जोर धरत आहे. या प्रस्तावामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असली तरी शिवसेना (उबाठा) मात्र मशाल चिन्हावरच निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते.
पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र चिन्हांवर किंवा स्थानिक आघाड्यांनी लढल्या जायच्या. त्यानंतर पक्षराजकारण बळावल्याने पक्षचिन्हावर निवडणुकांची दिशा बदलली. मात्र शहरातील सत्तासमीकरणे बदलत असल्याने पुन्हा एकदा स्थानिक आघाडीचा प्रयोग करण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहे.

याचबरोबर पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांचा या निवडणुकीतील सहभाग औत्सुक्याचा ठरत आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पण सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्याची चर्चा आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीचा प्रस्ताव अधिकच बळकट होताना दिसत आहे.
काँग्रेस ‘मोठा भाऊ’ असलेल्या संगमनेरातील या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार), डावे पक्ष आणि आरपीआय गट या सहकारी पक्षांची भूमिका काय राहणार, हे निर्णायक मानले जात आहे. यशस्वी ताळमेळ बसेल तर शहर विकास आघाडीचा प्रयोग अवतरू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे सध्या सत्ताधारी असलेल्या शिवसेना (शिंदे), भाजप आणि मित्रपक्षांचे लक्षही या हालचालींवर आहे. विरोधक एकत्र आल्यास सत्ताधार्‍यांकडून कोणती नवीन रणनीती अवतरते, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. शहराच्या राजकारणात वेगळा अध्याय सुरू करण्याची ही संधी आहे का? की पक्षचिन्हांवरील हट्ट आणि मतभेदांमुळे प्रस्तावित शहर विकास आघाडीची वाट अडणार? याचे उत्तर आता काही दिवसातच मिळणार असून संगमनेरची ही निवडणूक विशेष ठरणार याबाबत शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here