घुलेवाडी शिवारात दरोडा तयारीत असलेली सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद

0
175

मुख्य आरोपी फरार; संगमनेर शहर पोलीसांची धडाकेबाज कारवाई

संगमनेर (प्रतिनिधी)-
संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने घुलेवाडी शिवारात मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला साहित्यानिशी अटक केली. कारवाईदरम्यान एका आरोपीने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या टोळीवर संगमनेरासह जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून सुर्यवंशीची अर्धी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.
गुन्हा नोंद 939/2025 अन्वये बीएनएस कलम 310(4), 310(5) तसेच शस्त्र अधिनियम 25(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 ऑक्टोबर रोजी रात्री 00.45 च्या सुमारास पोलिसांना घुलेवाडी शिवारातील जुने हरिबाबा मंदिर परिसरात काही संशयित तरुण दरोड्याची तयारी करत असल्याची माहिती पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या परिसराला वेढा दिला. यावेळी दुचाकीवरून पळणार्‍या या दरोडेखोरांचा पाठलाग करून पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले. मात्र मुख्य आरोपी पोलिसांना गुंगारा देत निसटला.


या कारवाईत अटक आरोपी –
निखील विजय वाल्हेकर (रा. वेल्हाळे) सहा गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहीजे, अनिकेत गजानन मंडलिक (रा. माळीवाडा, संगमनेर) दहा गुन्ह्यांमध्ये पाहीजे, मोहन विजय खरात (रा. घुलेवाडी), आदित्य संजय शिंदे (रा. अकोले नाका) तर साई शरद सुर्यवंशी (रा. अकोले नाका) हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून तो घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या आरोपींकडून जप्त हत्यारे व साहित्य –
मोबाइल फोन, दोन दुचाकी, एअर पिस्तूल, दोन कोयते, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा, लोखंडी कटावणी, गज, नायलॉन दोरी, मिरचीपूड असा अंदाजे 1 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करीत आहेत.
या टोळीने संगमनेर व परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. काही दिवसांपूर्वी म्हाळुंगी नदी पुलावर लुटमार करताना एका तरुणाचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. या टोळीला जेरबंद करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अटक आरोपींना न्यायालयाने 27 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुर्यवंशी टोळीमुळे संगमनेर परिसरात निर्माण झालेली दहशत कमी करण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here