गेल्या वीस वर्षांपासून परंपरेने चालणारा सांस्कृतिक सोहळा; स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध

संगमनेर – शिरापुर (प्रतिनिधी) –
गेल्या दोन दशकांपासून दीपावली सणानिमित्त शिरापुर ग्रामस्थांच्या सहकार्याने साई सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जाणारा “भव्य दिव्य सांस्कृतिक व दीपावली महोत्सव व गुणगौरव सोहळा २०२५” यंदाही उत्साहात साजरा होणार आहे. अध्यक्ष जगन्नाथ पवार, उपाध्यक्ष हरी पवार, कार्याध्यक्ष सुशील पारासूर, सचिव शिवदास गायकवाड, खजिनदार प्रवीण पांडे तसेच प्रतिष्ठानमधील सर्व सदस्य मंडळी व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडत असून, शिरापूर हे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील असे पहिले गाव ठरले आहे, जेथे अशा प्रकारचा सांस्कृतिक दीपोत्सव नियमितपणे साजरा केला जातो.


या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ८.३० वाजता, गुरुवर्य वामन सर कला मंच, जिल्हा परिषद शाळा शिरापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विक्रम मीनानाथ पवार (सहाय्यक कार्यकारी अभियंता, धुळे विभाग) आणि अमोल बबन वर्पे (शहर अभियंता, सावदा नगरपरिषद, जळगाव) हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र राहणे (मुख्य अभियंता, प्रादेशिक कार्यालय पुणे, महाराष्ट्र राज्य) आणि आबासाहेब पारासुर (व्यवस्थापक, कॅनरा बँक, गुजरात) यांची उपस्थिती लाभणार आहे.
सदर महोत्सवात विविध कलागुणांचे सादरीकरण, गावातील प्रतिभावंतांचा गौरव तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम होणार असून, या उपक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.