संगमनेरचे नगराध्यक्षपद खुले महिला राखीव

0
278

आता लक्ष बुधवारी होणाऱ्या प्रभागनिहाय आरक्षणाकडे !

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सोमवारी नगराध्यक्षपद खुले महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून, आता बुधवारी होणार्‍या प्रभागनिहाय आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी साडेदहा वाजता नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गांनुसार प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणुक प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेण्याचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. यामुळे 2016 नंतर पुन्हा एकदा संगमनेर नगर परिषदेचा राजकीय आखाडा रंगणार आहे. मागील काही महिन्यांपासून नगरसेवक, माजी नगरसेवक आणि नवीन इच्छुक या सगळ्यांची धावपळ सुरू असून, आरक्षण ठरल्यानंतर राजकीय गणित अधिक स्पष्ट होईल.

संगमनेर नगर परिषदेत यंदा 15 प्रभागांमधून 30 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवकांची निवड होणार असून अंतिम प्रभाग रचना आधीच जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात एक महिला, एक पुरुष असे समीकरण असणार आहे. याचाच अर्थ पालिकेत 15 नगरसेवक पुरूष तर 15 महिला नगरसेविका आणि महिला नगराध्यक्षा असणार आहे.
नगराध्यक्षपद खुले महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने संगमनेर नगर परिषदेत पुन्हा एकदा ‘महिलाराज’ दिसणार आहे. त्यामुळे शहरातील महिला नेतृत्वाला मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अनेक इच्छुक महिला आता सक्रिय राजकारणात उतरायला सज्ज झाल्या आहेत.
बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरातील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीचे निकाल भविष्यातील राजकारणासाठी दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक पक्ष, गट-तट आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांची चढाओढ येत्या काही दिवसांत पाहायला मिळेल.

दरम्यान, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे अकोले नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्याकडे संगमनेर नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. पवार यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची सूत्रे हाती घेतली असून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बुधवारी आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर कोणते प्रभाग अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरक्षणानंतर प्रत्येक पक्षासाठी योग्य उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. दरम्यान, आरक्षण प्रक्रियेसंदर्भात 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत मुख्याधिकार्यांकडे हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अंतिम आरक्षण जाहीर केले जाईल.
आगामी दिवसांत म्हणजेच दिवाळी नंतर राजकीय सरगर्मीला उधाण येणार आहे. नगराध्यक्षपद व प्रभागनिहाय आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी, चर्चासत्रे आणि मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे.
2016 नंतर प्रथमच संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुका होत असल्याने राजकीय पक्ष, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. एकूणच, बुधवारी होणार्या आरक्षण प्रक्रियेनंतर संगमनेरच्या राजकीय वातावरणाला नवा वेग मिळणार असून, आगामी दिवसांत नगर परिषदेच्या निवडणुकीचा तापमान अधिक वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here