आ. सत्यजित तांबे संगमनेरात सक्रिय

0
548

काँग्रेसकडून मात्र कारवाई मागे घेण्यास टाळाटाळ

सत्यजित तांबेंकडून वेट अँड वॉच की मास्टरस्ट्रोक?

युवावार्ता (संजय आहिरे)
संगमनेर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे, विधानपरिषद सदस्य आ. सत्यजित तांबे यांच्या राजकीय हालचालींनी पुन्हा एकदा संगमनेरचे राजकारण गतीमान झाले आहे. ते अजून किती दिवस अपक्ष आमदार राहणार?, ते भाजपमध्ये जाणार का? या चर्चांना सातत्याने उधाण येते. मात्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या आणि काँग्रेस विचारसरणीतूनच घडलेल्या तांबे यांच्यावर झालेली हकालपट्टी दोन वर्षांनंतरही मागे घेतली गेली नाही, ही बाब कार्यकर्त्यांसाठी चक्रावून टाकणारी ठरत आहे.
दरम्यान, संगमनेरातील बदलत्या राजकीय समीकरणांत सत्यजित तांबे ठामपणे सक्रिय झाले असून विविध उपक्रमांमधून ते सातत्याने प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पक्षाचा झेंडा नसल्याने त्यांची ताकद स्थानिक पातळीवर मर्यादित होत असल्याचे जाणकार मानतात. राज्य पातळीवर अपक्ष आमदार म्हणून त्यांची कामे मार्गी लागत असली तरी, संगमनेरातील कार्यकर्त्यांमध्ये तांबे यांची पुढील दिशा काय? हा प्रश्‍न सतत चर्चेत आहे.
बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आणि गांधी परिवाराशी थेट संपर्कात असलेले नेते. तरीदेखील नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळणे, ही बाब आजही कार्यकर्त्यांच्या डोक्यातील कोडे आहे. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडूनही याबाबतीत कुठलाही निर्णय झाला नाही तर आता काँग्रेस पक्षाची धुरा संभाळणारे व अनेक संकटाचे आवाहन पेलणारे प्रदेशाध्यक्ष हषवर्धन सपकाळ देखील सत्यजीत तांबे व डॉ. सुधीर तांबे यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी कुठल्याही हालचाली करतांना दिसत नाही.
परिणामी तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला तर संगमनेरात थोरातांचा पराभव झाल्यानंतर आ. अमोल खताळ यांनी शिवसेना (शिंदे गट) च्या आधाराने मजबूत पायाभरणी केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ लाभल्याने खताळांचा प्रभाव वाढत असतानाच, थोरातांनी तांबे यांना थेट व्यासपीठ देऊन पुन्हा राजकीय रंगमंचावर आणले.


आज सत्यजित तांबे कधी अपक्ष आमदाराच्या भूमिकेत, तर कधी सत्ताधार्‍यांच्या जवळचे आमदार म्हणून समोर येतात; मात्र सार्वजनिक व्यासपीठावर ते थोरातांच्या छत्राखालीच कार्यरत असल्याचे दिसते. त्यामुळे विरोधक त्यांना अद्याप काँग्रेसचेच नेते म्हणून लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करतात.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पराभव विसरून बाळासाहेब थोरात यांनी आ. सत्यजीत तांबे यांच्यासोबत पक्षाची पुर्नबांधणी सुरू केली आहे. नाराजांची समजूत काढून नविन तरूणाईला सोबत घेण्यासाठी सत्यजीत तांबे यांची मोठी मदत थोरातांना होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे थोरात आणि काँग्रेससाठी सत्यजीत तांबे हुकमी एक्का ठरण्याची शक्यता आहे. तांबे हे तरुण, अभ्यासू, संघटनशक्ती असलेले नेते. त्यांचा राजकीय वारसा मजबूत असूनही पक्षाने त्यांच्यावर व त्यांच्या वडिलांवर कारवाई केली. ही कारवाई चुकीची आणि अन्यायकारक होती, असा सूर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांतून उमटतो. आज काँग्रेसला सक्षम, तरुण आणि ऊर्जावान नेतृत्वाची नितांत गरज असताना देखील सत्यजित तांबे यांना डावलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा राजकीय मार्ग पुढे कुठे वळणार, हा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे. दुसरीकडे काँग्रेस कारवाई मागे घेण्यास तयार असले तरी तांबेच ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे की काय, असा प्रश्‍न संगमनेरकरांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here