
फॉरेन्सिक तपासणीनंतर घटनेचे धागेदोरे स्पष्ट होणार
संगमनेर (प्रतिनिधी)- पठार भागातील सख्ख्या चुलत दोन बहिणीच्या आत्महत्येची ? घटना ताजी असतानाच संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात देखील एका तरुणाने आपल्या पत्नीचा खुन करुन स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी जय जवान चौकात राहावयास असलेल्या या प्रेमी युगलांच्या व्यक्तिगत वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने टोकाचे पाऊल उचल्याने या दुर्घटनेत दोघांची जीवनयात्राच संपली. या घटनेने संगमनेरसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये वैष्णवी संजय खांबेकर वय वर्ष 22 (माहेरचे आडनाव ) घोडेकर मळा तर तिचा पती कुलदीप सुनील अडांगळे वय वर्ष 35 इंदिरानगर या दोघांचा करूण अंत झाला आहे.
कुलदीप अडांगले हा अनेक वर्ष मुंबईत स्थायिक होता. या अगोदर त्याचे 3 लग्न झाल्याचे समजते. गणपती विर्सजनानंतर तो संगमनेरला आला व त्याने माहेरी गेलेल्या आपल्या पत्नीला बोलावून घेतले. त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाल्याने कुलदीप याने त्याच्या पत्नीला विषारी औषध देवून गळफास देत ठार केले. त्यानंतर त्याने स्वतःही पंख्याला लटकून आत्महत्या केली.
वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. परंतु अंतर्गत वादातून सदरची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर दोघांना ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुलदीपच्या शवाविच्छेदनानंतर रविवार दि 7 ला सायंकाळी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तर वैष्णवी संजय खांबेकर हिचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी लोणी प्रवरानगर येथे पाठवण्यात आला. फॉरेन्सिक अहवालानंतर घटनेचा उलगडा होईल. याबाबत शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
वैष्णवी हिच्यावर संगमनेर येथील स्मशानभूमी शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. वैष्णवीचे वडील संजय खांबेकर हे एका कापड दुकानात काम करतात ,तर आई गृहिणी असून वैष्णवी ही पदवीधर होती ती ब्युटी पार्लरही चालवत असे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेचे काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून सखोल तपासातून घटनेचा उलगडा होईल. शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे पुढील तपास करीत आहेत.
संगमनेरात दहा दिवस गणेशोत्सव आनंदात पार पडला मात्र त्यानंतर लगेचच साकुर येथे दोन सख्या चूलत बहिणींनी आत्महत्या केली आणि इकडे शहरात प्रेमप्रकरणातील जोडप्याने अंतर्गत वादातून एकाला संपवत दुसर्याने आत्महत्या केली. या दोन्ही घटनेतील मृतक हे 35 वर्षातील आतिल असल्याने याबाबत समाजमन हळहळले आहे.