संगमनेरच्या इंडस्ट्रिअल क्षेत्रातील कोहिनूर – संदीप फटांगरे

0
408

“वळणावरती थबकलेले जीवन,
खोल ध्यासाने घेतलेली दिशा…
स्वप्नांना दिले पंख,
आणि साकार झाली यशाची कथा!”
— मंगेश पाडगांवकर

जशा बॉलिवूडमध्ये लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, विशाल-शेखर जोड्या आहेत तशीच संगमनेरच्या इंडस्ट्रिअल क्षेत्रातील जोडी म्हणजे “मोंढे-फटांगरे”. फॅब्रिकेशन, फसाडस्, ग्रील्स, स्ट्रक्चरल वर्क, आर्किटेक्टरल स्टेअरकेस, फ्रेंच डोअर्स, पावडर कोटेड रॅक्स, कस्टमाईज्ड इंजिनिअरींग वर्क्स अशा प्रकराचे काम म्हटले की ऋषीकेश मोंढे आणि संदीप फटांगरे हीच जोडी आठवते. त्या जोडीतील संदीप फटांगरे यांचा आज वाढदिवस.

२५ जुलै १९७८ साली संदीप फटांगरे यांचा जन्म झाला. सारोळे पठार येथील लक्ष्मण सखाराम फटांगरे यांचे ते चिरंजीव. संगमनेर तालुका सहकारी शेतकी संघात क्लार्क म्हणून रुजू झालेले लक्ष्मणराव फटांगरे स्वकर्तृत्व आणि कष्टाच्या बळावर मॅनेजर झाले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मुशीत तयार झालेले लक्ष्मणराव फटांगरे शिस्त, व्यवहार आणि संस्था हितास प्राधान्य देत असल्यामुळे दादांचे अतिशय जवळचे. आर्थिक परिस्थिती बेताचीच. नोकरीस संगमनेरला असल्याने घासबाजारातील डेंगळे वाडा येथे १९८२ पर्यंत त्यांचे वास्तव्य होते. १९८३ साली शिवाजीनगर येथे रूम घेवून भाड्याने राहू लागले. संदीप फटांगरे यांची आई स्व. अलकाताई यांनी घरकाम आणि मुलांना सांभाळताना पती लक्ष्मणरावांना मोलाची सोथ दिली. मुलगी स्वाती अण्णासाहेब शिरोळे हिस स्वत:च्या पायावर उभे करण्यसाठी डि.एड. चे शिक्षण दिले. त्याचबरोबर संदिप आणि सचिन या मुलांचेही शिक्षण सुरू होते.
संदिप फटांगरे यांचे प्राथमिक शिक्षण आदर्श विद्या मंदीर येथे झाले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी सह्याद्री विद्यालय येथे पूर्ण केले. हुशार असल्याने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक येथे १९९८ साली मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पुढे काय करायचे असा प्रश्न होता? सहाजिकच वडिलांचे काम सहकारात असल्याने कोणत्यातरी संस्थेचे रुजू होण्याचा विचार सुरू होता.

प्रत्येक शनिवारी आपल्या वडिलांना आणण्यासाठी शेतकी संघात संदीप फटांगरे जायचे. त्यावेळे दादांनी त्यांना बोलावून घेतले आणि पुढे काय करायचे असे विचारले. नोकरी करावी असा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावर दादा म्हणाले भविष्याचा वेध घे, व्यवसाय सुरू कर. तुला आर्थिक अडचण असेल तर लोनची तरतूद मी करेन किंवा जागेची अडचण असेल तर जागाही उपलब्ध करून देईन. अगदी गरज पडली तर वर्क ऑर्डर देईन असे आश्वासन दादांनी दिले. वडिल लक्ष्मणराव फटांगरे, डॉ. एम. डी. घुले, दिलीपराव लंके, मेजर रावजी घुले, अड. सुदामराव आहेर, दत्तात्रय घुले, भाऊसाहेब फटांगरे, पंढरीनाथ काकड, तुकाराम फटांगरे, डोंगरे साहेब आणि मेढे साहेब यांच्या बरोबरीने कर्जुले पठार येथे डाळ मिल, दुध चिलींग प्लँट सुरू केले होते. डाळ मिलच्या मार्केटिंगसाठी काम करण्याचे संदीप फटांगरे यांनी ठरवले. नाशिकला सॅम्पल घेवून जायचा आणि व्यापाऱ्यांना ठरवून खप वाढवायचा असे काम सुरू झाले. यानंतर चिलिंग प्लँटच्या मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली. अनेक माणसे यातून जोडली गेली.


वडिलांबरोबर पुण्याला फिनोलेक्स कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याचा संदीप यांचा योग आला. तेथील ऑफिस, सिस्टीम, कल्चर, रिसेप्शन आणि हॉस्पिटॅलिटी पाहून आपली कंपनी अशीच असावी असे पहिले स्वप्न त्यांनी पाहिले. व्यवसाय भांडवलावर चालतो आणि भांडवल नसल्यामुळे १९९९ मध्ये नाशिक येथील टर्न ओ स्कील नावाच्या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी स्वीकारली. एचएएल च्या विशिष्ट रबर्ससाठी डाय बनविण्याची ही कंपनी. त्यातून रॉ मटेरिअल आणि प्रोसेसची चांगली माहिती त्यांना मिळाली. मात्र कंपनीचे काम वाढले आणि गोंधळही वाढला. या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा वापर करत सिस्टीम डेव्हलप करण्याचे मोठे काम संदीप फटांगरे यांनी केले. ड्रॉईंग, फिलींगच्या फाईल्स कशा मेंटेन करायच्या आणि त्यावर काम कसे करायचे याचे चांगले नियोजन त्यांनी केले. यावेळी बालमित्र ऋषीकेश मोंढे हे सुध्दा डिप्लोमा पूर्ण करून नाशिकला दुसऱ्या कंपनीत जॉबला लागले. साधारण ८ महिने हा जॉब चालला.
कमीत कमी भांडवल आणि सर्वात जास्त ग्रोथ असलेला व्यवसाय म्हणजे रिअर इस्टेट हे त्यांनी ओळखले. त्यातल्या त्यात बांधकाम क्षेत्रातील फॅब्रिकेशनचे काम आपण करू शकतो हे त्यांनी मनोमन ठरवले. नाशिक अशोकनगर येथील कन्स्ट्रक्शन साईटवर एक फॅब्रिकेटर ग्रील्स बनविताना दिसला आणि त्याला संदीप फटांगरे यांनी विचारले की मला काम पाहिजे. कटींगपासून सुरू झालेले काम मेजरमेंट, वेल्डिंग, ड्रॉईंग आदीपर्यंत येऊ लागले. या अनुभवामुळे आत्मविश्वास वाढला.
संगमनेरमधील एकता चौकात पिठाची गिरणी सुरू केली. त्यावेळी दोन्ही बंधू संदीप आणि सचिन ही पिठाची गिरणी चालवायचे. वीजेची सोय असल्याने या पिठाच्या गिरणीशेजारीच २००० साली फॅब्रिकेशनचे साधे वर्कशॉप सुरू झाले. या वर्कशॉपचे पहिले कर्मचारी संदीप फटांगरे आणि दुसरे कर्मचारी ऋषिकेश मोंढे. यानंतर १-२ कर्मचारी भरल्यानंतर वर्कशॉपमधील वेल्डिंग वर्क सुरू झाले. काम करण्याची पध्दत, ग्राहकांबरोबरचे कम्युनिकेशन, क्वालिटी, मार्गदर्शन यामुळे प्रत्यक्ष ग्राहकांकडूनच कामे मिळू लागली. संगमनेरमध्ये ठराविक इंजिनिअर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स असल्याने सुरूवातीला त्यांच्याकडून कामे मिळाली नाहीत. मात्र इफेक्टीव्ह कॉस्टिंग, कॉस्ट कटिंग, अस्थेटिक लूक आणि क्वालिटीमुळे कॉन्ट्रॅक्टरही कामे देऊ लागली. २००४ साली बंधू सचिन धान्य दुकान बघू लागले. यातूनच सिध्दी मार्केटचा जन्म झाला आणि त्यांनी सुपर शॉपीमध्ये लक्ष घालायला सुरूवात केली. एकीकडे काम निम्यात सोडून जाणारे फॅब्रिकेशनचे काम मिळवून पूर्ण केल्याने सर्वांचाच विश्वास मोंढे फटांगरे यांच्यावर बसला. अमृतवाहिनी एम.बी.ए. कॉलेज, एस.एम.बी.टी. स्टाफ क्वार्टर्स आदींची कामे मिळाली.
२००७ साली कांचन कम्फर्ट शेजारी २००० स्क्वे.फूट. मध्ये साई स्वामी हेक्सटेक कंपनीची स्थापना झाली. इंडस्ट्रिअल कामाची खऱ्या अर्थाने येथे सुरूवात झाली. २००९ साली संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये स्वत:ची जागा घेतली. २०१३ मध्ये २००० स्क्वे.फूटचे बांधकाम पूर्ण होऊन साई स्वामी हेक्स्टेक कंपनीची सुरूवात झाली. पॉवर प्रेस, सीओटू वेल्डिंग, ऑक्सिफ्यूएल कटींग मशीन आदींच्या सहाय्याने या व्यवसायात प्रगती करत २०१६ साली एकूण ७५०० स्क्वे.फूटच्या जागेमध्ये साई गजानन स्टील इंडस्ट्रिजची स्थापना झाली. साधारण ५०-६० गरजूंना या ठिकाणी काम उपलब्ध झाले. २०२० साली संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन साई आशीर्वाद इंडस्ट्रिजची स्थापना संदीप फटांगरे यांनी केली.
भविष्याचा मागोवा घेत २०२१ साली लेझर कटींग, शेअरींग, बेंडींग, पावडर कोटींग या परिपूर्ण युनिटचे काम सुरू झाले आणि साई आशीर्वाद इंडस्ट्रिजने २००-२५० कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. २०२४ मध्ये एकूण ४०,००० स्क्वे. फूट जागेत त्यांचे काम चालले आहे. २०२६ पर्यंत अजून ४०,००० स्क्वे.फूट जागेत त्याचे काम सुरू होणार आहे. व्यवसाय करताना त्यांना दोन माणसांची अतिशय चांगली मदत झाली ते म्हणजे स्व. भाऊसाहेब थोरात आणि दुसरे म्हणजे श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले. आ. दादांनीच संदीप फटांगरे यांना सांगितले की व्यवसाय करायचा तर साहेबराव नवले सारखा. प्रचंड शिस्त, सुरळीत आर्थिक व्यवहार, कामाचे आणि वेळेचे चोख नियोजन आणि व्यवसायावर फोकस असणारे साहेबराव नवले यांनी संदीप फटांगरे यांच्यातील टॅलेंट ओळखले आणि आज श्रमिकच्या प्रत्येक कामामध्ये संदीप फटांगरे सहभागी आहेत. अग्रीकल्चर इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इंडस्ट्रिअर आणि कमर्शिअल सेक्टरमध्ये काम करणारे संदीप फटांगरे यांनी १००० रूपयांपासून केलेल्या कामाचे रूपांतर आज कित्येक कोटींमध्ये झाले आहे. त्यांची पत्नी प्रतिभा फटांगरे ही त्यांची भक्कम आधार आहे. अतिशय शांत, मृदू, प्रसन्न मुद्रासोबत मनमिळावूपणा, नेतृत्वगुण, प्रगल्भ दृष्टीकोन, तंत्रज्ञानाची जाण, संवादकौशल्य आणि प्रामाणिकपणाचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे संदीप फटांगरे — काळाची पावले अचूक ओळखणारे खरे यंत्रमाग असलेले उद्योजक.
मुलगा वरद अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात एम.आय.टी. पुणे येथे शिक्षण घेत आहे. प्रथम वर्षातच त्याने एक प्रोजेक्ट हाती घेतला. त्याचे काम स्वत: संगमनेरच्या वर्कशॉपमध्ये पूर्ण केले. त्यांची संपूर्ण टीम नेदरलँड येथे हा प्रोजेक्ट सादर करण्यासाठी गेली आहे. पुढच्या सात ते आठ वर्षांत पुढची पिढी या व्यवसायात उतरणार आहे. पुढच्या पिढीबरोबर व्यवसायाच्या गप्पा, शिक्षणाची दिशा, भविष्यातील मार्कट, मॅनेजमेंट, प्रॉडक्ट, कम्युनिकेशन याचा आधार घेवून पीईबी शेडस् आणि अलॉय मेटल, रोलिंग मील याचा रॉ मटेरिअल याचे प्रॉडक्शन करण्याचा त्यांचा मानस आहे.
इतका मोठा व्यवसाय असूनही संदीप फटांगरे यांनी मातीशी नातं, वडिलांचे संस्कार, आणि ज्या लोकांनी आयुष्यात हात दिला त्यांच्याशी जोडलेले ऋणानुबंध आजही जपले आहेत.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना, त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला सलाम करताना असेच वाटते —
त्यांनी फक्त उद्योग केला नाही, तर एक विचार उभा केला आहे — तंत्रज्ञान, मूल्यं, गुणवत्ता आणि माणूसकी यांचा विचार.
त्यांनी फक्त यंत्र चालवली नाहीत, तर अनेक तरुणांच्या हातात रोजगार, विश्वास आणि सन्मान दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here