माजी नगराध्यक्षाच्या पुतण्यासह तरुणाला जीवे मारण्याच्या धमक्या, १७ जणांवर गुन्हे दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या छायेत सापडले आहे. माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्यनगर येथील निवासस्थानावर तसेच नेहरू चौकातील कानकाटे यांच्या घरावर मंगळवारी (दि. 22 जुलै) पहाटेच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दोन्ही कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण 17 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
पहिला हल्ला – या प्रकरणी माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे बंधू शिवाजी मुर्तडक यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे पुतणे वैष्णव मुर्तडक याला मोठ्याने हाक मारण्यात आली. खिडकीतून पाहिल्यावर तीन वाहनांमधून आलेल्या 10 ते 12 जणांनी घराच्या दरवाज्यावर जोरदार लाथा मारत वैष्णव, तू खाली ये अशी आरडाओरड केली. यामध्ये विश्वास निसाळ, अंकुश जेधे, संतोष गायकवाड आणि सनी धारणकर या संशयितांची नावे स्पष्टपणे समोर आली आहेत.
यावेळी घरातील सदस्यांनी धाडसाने दरवाजा न उघडता त्वरित पोलिसांना फोन केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र साडेतीनच्या सुमारास हेच टोळके पुन्हा हातात काठ्या, लोखंडी रॉड, गज व धारदार गुप्तीसह परतले आणि पुन्हा दरवाज्यावर लाथा मारून वैष्णवला धमक्या दिल्या. विशेष म्हणजे, या आरोपींनी वैष्णवच्या मोबाईलवर थेट फोन करून त्याला जीवे मारण्याची उघड धमकी दिली.
दुसरा हल्ला – या घटनेच्या काही वेळातच, नेहरु चौकातही अशाच स्वरूपाची दुसरी घटना घडली. येथील रहिवासी व भाजी विक्रेते शीतलकुमार कानकाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पहाटे सव्वादोनच्या सुमारास विश्वास निसाळ आणि संतोष गायकवाडसह पाच ते सहा जण त्यांच्या घरी हातात काठ्या व लाठ्यांसह आले. त्यांनी त्यांच्या मुलगा आदित्यच्या नावाने मोठमोठ्याने आरडाओरड केली आणि शिवीगाळ करत त्यालाही मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली. या दोन गंभीर घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संगमनेर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.